वृत्तपत्रांमधील बातम्यांसाठी गुगलने महसुलातील वाटा द्यावा'; ऑस्ट्रेलियातील कायद्यानंतर ‘आयएनएस’ने केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 00:37 IST2021-02-26T00:36:58+5:302021-02-26T00:37:13+5:30
ऑस्ट्रेलियातील कायद्यानंतर ‘आयएनएस’ने केली मागणी, ८५ टक्के महसुलाची मागणी

वृत्तपत्रांमधील बातम्यांसाठी गुगलने महसुलातील वाटा द्यावा'; ऑस्ट्रेलियातील कायद्यानंतर ‘आयएनएस’ने केली मागणी
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुक आणि गुगलने बातम्यांसाठी संबंधित वृत्तसंस्थांना शुल्क देण्यासंबंधी कायदा केल्यानंतर आता भारतातही अशाच पद्धतीची मागणी करण्यात आली आहे. इंडियन न्यूजपेपर साेसायटीने (आयएनएस) गुगलकडे जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नातील ८५ टक्के वाटा देण्याची मागणी केली आहे.
आयएनएसचे अध्यक्ष एस. आदिमूलम यांनी गुगल इंडियाचे भारतातील प्रमुख संजय गुप्ता यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की बातम्यांसाठी वृत्तपत्रांकडून हजाराे पत्रकारांची सेवा घेण्यात येते. यासाठी वृत्तपत्रांकडून प्रचंड खर्च करण्यात येताे. त्यामुळे वृत्तपत्रांमधील बातम्यांसाठी गुगलने शुल्क दिले पाहिजे.
भारतामध्ये विश्वासार्ह मजकुरामुळेच गुगलवर विश्वास वाढला आहे, याकडेही आदिमूलम यांनी लक्ष वेधले आहे. गुगलच्या जाहिरात मूल्यांची प्रकाशकांकडे माहिती नसते. त्यामुळे प्रकाशकांना अपारदर्शी जाहिरात व्यवस्थेचा सामना करावा लागताे. गुगलने जाहिरातींमधून मिळणाऱ्या महसुलातील ८५ टक्के वाटा प्रकाशकांना दिला पाहिजे. तसेच तसेच प्रकाशकांना देण्यात येणाऱ्या महसुली अहवालात अधिक पारदर्शकता आली पाहिजे, असे आदिमूलम यांनी म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाने केला कायदा
साेशल मीडिया कंपन्यांना स्थानिक वृत्त दाखविण्यासाठी पैसे माेजावे लागणार आहेत, असा कायदा करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिलाच देश ठरला आहे.