पोटनिवडणुकांतही काँग्रेसला बरे यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 06:10 IST2019-10-25T03:20:46+5:302019-10-25T06:10:48+5:30
अनेक राज्यांत झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस व प्रादेशिक पक्षांचा प्रभाव दिसून आला.

पोटनिवडणुकांतही काँग्रेसला बरे यश
नवी दिल्ली : अनेक राज्यांत झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस व प्रादेशिक पक्षांचा प्रभाव दिसून आला. उत्तर प्रदेशमध्ये पैकी आठ जागा भाजपने जिंकल्या तर समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि अपना दलने (एस) प्रत्येकी एक जागा जिंकली.
गुजरातच्या चारही जागांवर काँग्रेसने बाजी मारली. पंजाबमध्ये काँग्रेसने तीन व अकाली दलाने एक जागा जिंकली आहे. बिहारातील सिमरी बख्तियारपूर विधानसभेची जागा राजदने जेडीयूकडून खेचून घेतली. समस्तीपूर लोकसभा जागा लोकजनशक्ती पार्टीने कायम राखली.
तामिळनाडूतील जागेवर अद्रमुकने द्रमुकचा पराभव केला. केरळमध्ये काँग्रेसच्या यूडीएफला तीन, तर माकपच्या एलडीएफला दोन जागा मिळाल्या. राजस्थानात एक जागा काँग्रेसने तर दुसरी राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीने जिंकली. मध्यप्रदेशातील झाबुआमध्ये काँग्रेसच्या कांतिलाल भूरिया यांनी भाजपचा पराभव केला.
सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग मात्र निवडून आले. भाजपने राज्यात प्रथमच खाते उघडले असून दोन जागांवर विजय मिळविला आहे. हिमाचलमध्ये एक जागा भाजपला मिळाली, तर दुसऱ्या जागी भाजपचा पराभव झाला. ओडिशात बिजदने भाजपला पराभूत केले, तर तेलंगणातं टीआरएसचा विजय झाला.