Indian Railways : ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! रेल्वे तिकिटांवर पुन्हा मिळू शकते सवलत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 14:03 IST2022-04-09T14:03:07+5:302022-04-09T14:03:55+5:30
Indian Railways : एका अहवालानुसार, सध्या देशात अशी दावा न केलेली रक्कम सव्वा लाख कोटींहून अधिक आहे आणि आत्तापर्यंत या निधीतून ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित अनेक योजना कार्यान्वित केल्या जात आहेत.

Indian Railways : ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! रेल्वे तिकिटांवर पुन्हा मिळू शकते सवलत
नवी दिल्ली : ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) रेल्वे तिकिटांमध्ये (Train Ticket) मिळणाऱ्या सवलतींबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने यासंदर्भात रेल्वेकडून माहिती मागवली आहे. दरम्यान, कोरोनाचा धोका कमी झाल्याने आणि देशातील इतर सर्व घडामोडी आता सामान्य झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी भाड्यात सवलत देण्यासाठी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. यामुळे वाढता दबाव कमी करण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय सक्रिय भूमिका बजावत आहे. सरकार या प्रयत्नात आहे की, रेल्वेवर आर्थिक ताण पडू नये आणि सवलतीही देता येतील.
एका अहवालानुसार, सध्या देशात अशी दावा न केलेली रक्कम सव्वा लाख कोटींहून अधिक आहे आणि आत्तापर्यंत या निधीतून ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित अनेक योजना कार्यान्वित केल्या जात आहेत. सध्या ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित संघटनांची मागणी लक्षात घेऊन सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने यासंदर्भात रेल्वेकडून आवश्यक माहिती मागवली असून, त्यानंतर केंद्र सरकार पुढील धोरणावर काम करेल.
दोन वर्षांपासून ही सुविधा बंद
कोरोना महामारीच्या काळात खराब आर्थिक स्थिती लक्षात घेता, गेल्या दोन वर्षांपासून रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसह तीन श्रेणी वगळता इतर सर्वांसाठी भाड्यात सवलत बंद केली होती. मात्र, ही सुविधा कधी सुरू होणार याबाबत स्पष्टता नाही. मात्र ज्याप्रकारे ज्येष्ठ नागरिकांकडून ही सुविधा पुन्हा सुरू करण्यासाठी दबाव वाढत आहे, ते पाहता त्यावर लवकरच निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. सध्या देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे 14 कोटी आहे.
रेल्वेमंत्री काय म्हणाले होते?
दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच लोकसभेत सांगितले होते की, सुमारे सात कोटी ज्येष्ठ नागरिक जवळपास दोन वर्षांपासून कोणतीही सूट न देता रेल्वेने प्रवास करत आहेत. त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात कोणतीही सूट न देता प्रवास करावा लागत आहे.