उत्तर प्रदेशातील गोंडा येथे आपल्या होणाऱ्या सासूसोबत पळून गेलेल्या जावयाला पोलिसांनी पकडलं आहे. ७२ तासांनंतर दोघांनाही पकडण्यात पोलिसांना यश आलं. होणाऱ्या जावयासह पळून गेलेल्या सासूने "माझी मानसिक स्थिती ठीक नाही. म्हणूनच मी माझ्या जावयाला घेऊन निघून गेले, पण आता मी त्याच्याशी कधीही बोलणार नाही. मी फक्त माझ्या नवऱ्यासोबतच राहीन" असं सांगितलं.
दुबौलिया पोलिसांनी सासू आणि जावई दोघांनाही ताब्यात घेतलं आणि चौकशीनंतर त्यांना पती किशनसह खोडारे पोलिसांच्या ताब्यात दिलं. हे प्रकरण गोंडा जिल्ह्यातील खोडारे पोलीस स्टेशन परिसरातील हबीरपूर गावचं आहे. किशन यांनी आपल्या मुलीचं लग्न बस्ती जिल्ह्यातील दुबौलिया पोलीस स्टेशन परिसरातील भुईरा गावातील रहिवासी रामस्वरुपसोबत ठरलं होतं.
रामस्वरुप त्याच्या वधूपेक्षा त्याची सासू उषा देवीशी तासन्तास जास्त बोलत असे. मग अचानक एके दिवशी त्याने स्वतःच किशन यांच्या मुलीशी असलेलं नातं तोडलं. तो म्हणाला- मला हे लग्न करायचं नाही. पण त्याने सासू उषा देवी (४४) यांच्याशी कॉन्टॅक्ट कायम ठेवला. हळूहळू सासू आणि जावई यांच्यातील जवळीक वाढू लागली. त्यानंतर २५ एप्रिल २०२५ च्या सकाळी उषा देवी रामस्वरुपसोबत कोणालाही न सांगता निघून गेली.
उषा देवीचा नवरा किशन यांनी पत्नीचा खूप शोध घेतला. कोणतीही माहिती न मिळाल्याने २७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता ते खोडारे पोलीस ठाण्यात गेले आणि पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. तिथे त्यांनी उषा देवी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली, त्यानंतर खोडारे पोलिसांनी बस्तीच्या दुबौलिया पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती दिली.
दुबौलिया पोलिसांनी रामस्वरुपशी संपर्क साधला आणि त्याची चौकशी केली. तेव्हा रामस्वरुप दिशाभूल करत राहिला. पण मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून एसओ प्रदीप सिंह यांनी ७२ तासांच्या आत सासू आणि जावईला शोधून काढलं. चौकशीनंतर उषा देवीला तिच्या पतीकडे सोपवण्यात आले. माझी मानसिक स्थिती ठीक नसल्याने मी माझ्या होणाऱ्या जावयासह गेली होती. आता मी रामस्वरुपसोबत जाणार नाही. मी पती किशन यांच्यासोबत हबीरपूरमध्ये राहीन असं उषा देवीने सांगितलं. यानंतर उषा देवी पतीसोबत निघून गेली.