Gold particles are coming ashore from the sea in Uppada village of Andhra! | समुद्रकिनारी चक्क सोन्याचे कण सापडले; गावकऱ्यांची पळापळ, सरकारी अधिकारीही सरसावले

समुद्रकिनारी चक्क सोन्याचे कण सापडले; गावकऱ्यांची पळापळ, सरकारी अधिकारीही सरसावले

काकिनाडा : नीवर चक्रीवादळाने अलीकडेच तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या किनारी भागांना तडाखा दिला. 
किनारी भागातील अनेक गावांचे नुकसान झाले. मात्र, आंध्र प्रदेेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील उप्पाडा गावासाठी नीवर चक्रीवादळ वरदान ठरले. कारण चक्रीवादळानंतर येथील समुद्रकिनाऱ्यावर चक्क सोन्याचे कण आढळू लागले आहेत! रेशमी साड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या उप्पाडा गावातील मच्छिमारांना गेल्या आठवड्यात समुद्रकिनाऱ्यावर चक्क सोन्याचे कण सापडू लागले. किनाऱ्यावर सोने सापडत असल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. 

जो तो आपले नशीब आजमावण्यासाठी किनाऱ्यावर धाव घेऊ लागला. लाटांनी किनाऱ्यावर आणलेला गाळ चाळून त्यातून सोने शोधण्याची धडपड सुरू झाली. आतापर्यंत ५० लोकांना प्रत्येकी साडेतीन हजार रुपये किमतीचे सोने सापडल्याचा दावा येथील स्थानिकांनी केला आहे. मात्र, प्रत्येकाला सोने मिळालेच असे नाही. तरीही किनाऱ्यावर सोन्याचा शोध सुरूच आहे. 

हे असे का झाले?
समुद्रकिनाऱ्यावर सोने का सापडत आहे, याचे ठोस कारण कोणाला सांगता आलेले नाही. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथील किनारी भागातील जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर होत असल्याने अलीकडेच दोन मंदिरे पडल्याच्या घटना घडल्या. तसेच तुफानी वाऱ्यांमुळे घरे कोसळण्याचेही प्रकार घडले आहेत.

पडलेली घरे व मंदिरे समुद्री लाटांनी आत ओढून नेली. नवीन वास्तू वा मंदिर बांधताना पायाभरणीवेळी सोने अर्पण करण्याची गावात प्रथा आहे. कदाचित समुद्राच्या उदरात गडप झालेल्या या घर वा मंदिराच्या पायाभरणीचे सोने समुद्री लाटा किनाऱ्यावर घेऊन येत असतील, असा अंदाज स्थानिक पोलिस व्यक्त करत आहेत. दरम्यान, महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारी लवकरच येथील परिसराची पाहणी करणार आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Gold particles are coming ashore from the sea in Uppada village of Andhra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.