लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 19:53 IST2025-12-11T19:50:34+5:302025-12-11T19:53:08+5:30
Delhi High Court Refuse Luthra Brothers Anticipatory Bail: सौरभ आणि गौरव लुथरा यांनी अटक टाळण्यासाठी आपली धडपड सुरू ठेवली आहे.

लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
Delhi High Court Refuse Luthra Brothers Anticipatory Bail: हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबमधील आग प्रकरणात फरार असलेल्या सौरभ आणि गौरव लुथरा यांनी अटक टाळण्यासाठी आपली धडपड सुरू ठेवली आहे. या प्रकरणी दिल्लीउच्च न्यायालयाने लुथरा बंधूंचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. याबाबत करण्यात आलेली याचिका फेटाळताना न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले.
लुथरा बंधूंनी दिल्लीतील रोहिणी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. परंतु, तो न्यायालयाने फेटाळला. यानंतर लुथरा बंधूंनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी धाव घेतली. गुरुवारी या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. आरोपी लुथरा बंधूंचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने कठोरपणे फेटाळला आहे. सोशल मीडियावर सतत जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे गोव्यात जिवाला धोका असल्याचा आरोपींचा युक्तिवादही न्यायालयाने फेटाळला.
हा गुन्हा अत्यंत गंभीर आणि भयानक आहे
दिल्ली उच्च न्यायालयाने लुथरा बंधूंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करताना म्हटले की, प्रथमदर्शनी २५ जणांचे बळी गेलेला हा गुन्हा अत्यंत गंभीर आणि भयानक आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने लुथरा बंधूंच्या वर्तनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आरोपींनी न्यायालयापासून महत्त्वाची तथ्ये लपवल्याचेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तपास अधिकारी किंवा न्यायालयाने कायद्यानुसार केलेली कारवाई जीवाला धोका म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने आरोपींना विचारले की, त्यांनी गोव्यातील सक्षम न्यायालयात याचिका का दाखल केली नाही. याचिकेसोबत दाखल केलेली कागदपत्रे प्रथमदर्शनी त्यांच्या विधानांशी सुसंगत नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
देश सोडून जाणे त्यांच्या हेतूंवर शंका निर्माण करते
कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की, परवाना करार, व्यापार परवाना आणि भाडेपट्टा करार आधीच कालबाह्य झाला आहे. ज्यामुळे क्लब बेकायदेशीरपणे कार्यरत असल्याचे दिसून येते. अर्जदारांनी न्यायालयापासून महत्त्वाची तथ्ये लपवली होती. इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतर इतक्या लवकर देश सोडून जाणे त्यांच्या हेतूंवर शंका निर्माण करते, असेही दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. दुसरीकडे, थायलंडमधील फुकेत येथे पळून गेलेले क्लबचे फाउंडर गौरव आणि सौरभ लूथरा यांना थायलंड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेच्या अवघ्या १०० तासांच्या आत ही मोठी कारवाई करण्यात आली असून, यामुळे दोन्ही आरोपींना भारतात प्रत्यार्पित करण्याची प्रक्रिया आता अत्यंत सोपी झाली आहे.
दरम्यान, संशयित गौरव व सौरभ लुथरा यांनी अंतरिम दिलासा म्हणून अटकपूर्व जामीन मागितला होता. संशयितांच्यावतीने अॅडव्होकेट सिद्धार्थ लुथरा आणि अॅडव्होकेट तन्वीर अहमद न्यायालयात उपस्थित होते. तर राज्याचे प्रतिनिधित्व करत सिनिअर अॅडव्होकेट अभिनव मुखर्जी आणि गोवा सरकारचे स्टैंडिंग काउन्सिल अॅडव्होकेट सुरजेन्दू शंकर दास यांनी बाजू मांडली. गौरव आणि सौरभ यांच्या ट्रान्झिट अँटिसिपेटरी बेल अर्जावर दिल्लीतील रोहिणी न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे.