गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 21:26 IST2025-12-08T21:21:04+5:302025-12-08T21:26:43+5:30
२५ बळींचे आरोपी घटनेनंतर ५ तासांत थायलंडला पसार झाले असून त्यांना पकडण्यासाठी गोवा पोलिसांकडून इंटरपोलची मदत घेतली जात आहे.

गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
Goa Club Fire: गोव्यातील अर्पोरा येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. नाईट क्लबचे मुख्य आरोपी आणि मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा हे घटनेनंतर अवघ्या पाच तासांतच देश सोडून थायलंडमधील फुकेत शहरात पसार झाल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे. आता गोवा पोलिसांनी या दोन्ही फरार आरोपींना पकडण्यासाठी इंटरपोल या आंतरराष्ट्रीय संस्थेची मदत मागितली आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, ही भीषण दुर्घटना ६ डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. आरोपींनी चौकशी आणि कारवाईपासून वाचण्यासाठी तातडीने देशाबाहेर पळण्याचा कट रचला होता. मुंबई इमिग्रेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी ७ डिसेंबरच्या सकाळी ५:३० वाजता इंडिगोच्या विमानाने फुकेतसाठी रवाना झाले होते. एफआयआर नोंदवल्यानंतर गोवा पोलिसांचे पथक तात्काळ दिल्लीला रवाना झाले होते, पण आरोपी त्यांच्या ठिकाणांवर उपस्थित नव्हते. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानावर कायद्यानुसार नोटीस लावण्यात आली.
इंटरपोलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध
गोवा पोलिसांनी दोन्ही फरार आरोपींवर पकड घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. पोलिसांनी ७ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत दोन्ही आरोपींविरुद्ध एलओसी जारी केले होते, पण तोपर्यंत आरोपी देश सोडून पसार झाले होते. गोवा पोलिसांनी आता आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी सीबीआयच्या इंटरपोल विभागाशी संपर्क साधला आहे. आरोपी थायलंडमध्ये लपून बसले असल्याची पोलिसांना शंका आहे.
एका आरोपीला अटक
या प्रकरणातील अन्य एक आरोपी भारत कोहली याला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला पुढील चौकशीसाठी ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणले जात आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सर्व २५ लोकांचे शवविच्छेदन पूर्ण झाले असून, मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.