कुत्र्यांवरून वाद, कडाक्याचं भांडण, दिल्लीतल्या पर्यटकाने गोव्यात स्थानिक महिलेला चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 19:09 IST2025-02-22T19:08:53+5:302025-02-22T19:09:09+5:30
Goa Crime News: उत्तर गोव्यातील पेरणे येथे शुक्रवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे दिल्लीहून फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाने आपल्या कारने एका स्थानिक महिलेला चिरडले. यात या महिलेचा मृत्यू झाला.

कुत्र्यांवरून वाद, कडाक्याचं भांडण, दिल्लीतल्या पर्यटकाने गोव्यात स्थानिक महिलेला चिरडले
उत्तर गोव्यातील पेरणे येथे शुक्रवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे दिल्लीहून फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाने आपल्या कारने एका स्थानिक महिलेला चिरडले. यात या महिलेचा मृत्यू झाला. या पर्यटकाने कुत्र्यांवरून झालेल्या किरकोळ वादानंतर रागाच्या भरात हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दीपक बत्रा याला अटक केली आहे.
या मिळालेल्या अधिक माहितीनुसार मृत महिलेचं नाव मारियाफेलिज फर्नांडिस (६७) असून, ती मुलगा जोसेफ फर्नांडिस याच्यासोबत पेरणे येथे राहायची. दिल्लीतील रहिवासी असलेला दीपक बत्रा हा कुटुंबासोबत गोव्यात फिरायला आला होता. त्याच्यासोबत त्याचा एक कुत्राही होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक बत्राचा कुत्रा आणि मारियाफेलिज हिच्या कुत्र्यांमध्ये सातत्याने भांडणं होत राहायची.
यादरम्यान, शुक्रवारी रात्री दीपक बत्राचं कुटुंब कुत्र्याला घेऊन फिरायला बाहेर पडलं होतं. तेव्हा मारियाफेलिस आणि त्यांचा मुलगा जोसेफ यांनी कुत्र्याला आमच्या घरासमोर आणू नका अशी विनंती त्याला केली. मात्र यावरून दीपक बत्रा आणि मारियाफेलिज यांच्यात भांडण झालं. त्यावेळी दीपक बत्रा याच्या कुटुंबातील एका महिलेने भांडणादरम्यान, मारियाफेलिज हिच्या केसांना धरून जमिनीवर ढकलले.
त्यानंतर जोसेफ हे आईला उचलण्यासाठी आले असता त्यांनाही धक्का देण्यात आला. त्यात तेही किरकोळ जखमी झाले. त्यानंतर बत्राचं कुटुंब तिथून निघून गेलं. मात्र काही वेळाने दीपक बत्रा हा कार घेऊन तिथून तो पुन्हा गेला. यावेळी दीपक बत्रा याने वेगाने कार चालवली आणि रस्त्याशेजारी खुर्चीवर बसलेल्या मारियाफेलिज हिला धडक दिली. या धडकेत मारियाफेलिज ही १० मीटरपर्यंत फरफटत गेली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेनंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली. दरम्यान, आरोपी दीपक बत्रा याला पोलिसांनी अटक केली आहे.