गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 17:07 IST2025-12-10T17:06:42+5:302025-12-10T17:07:02+5:30
Goa Club Fire Luthra Brothers: २५ बळींच्या घटनेनंतर फरार झालेले लूथरा बंधू थायलंडमध्ये अटक टाळण्यासाठी कोर्टात. 'आग लागण्यापूर्वीच बाहेर गेलो' असा वकिलांचा युक्तिवाद. भारत-थायलंड प्रत्यार्पण संधिचा धोका.

गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
गोव्यातील अरपोरा येथील 'बर्च बाय रोमियो लेन' या नाइटक्लबला लागलेल्या भीषण आगीत २५ लोकांचा बळी घेतल्यानंतर फरार झालेले क्लबचे मुख्य मालक सौरभ आणि गौरव लूथरा यांनी थायलंडमधून अटकेपासून वाचण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत या दोघांनी 'अटकपूर्व जामीन याचिका' दाखल केली असून, अटक झाल्यास तातडीने भारत परतण्यास नकार दिला आहे.
प्रशासनाकडून त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. आम्ही दिल्लीतून काम पाहतो. क्लबचा दैनंदिन कारभार ऑन-ग्राउंड मॅनेजर आणि रेस्टॉरंट मॅनेजर पाहतात. क्लबला ७ डिसेंबर रोजी आग लागली. मात्र, लूथरा बंधू ६ डिसेंबर रोजीच व्यावसायिक भेटीसाठी आणि संभाव्य रेस्टॉरंट ठिकाणे पाहण्यासाठी थायलंडला गेले होते. ते नेहमीच देश-विदेशात कमी वेळेत प्रवासाला जातात, असे त्यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले.
क्लबला आग लागल्यानंतर काही तासांतच लूथरा बंधू भारत सोडून थायलंडला पळून गेले होते. यानंतर त्यांच्याविरुद्ध इंटरपोलने 'ब्लू कॉर्नर नोटीस' जारी केली आहे. लूथरा बंधूंच्या वतीने वरिष्ठ वकील सिद्धार्थ लूथरा आणि तनवीर अहमद मीर यांनी कोर्टाला सांगितले की, "आमच्या अशिलास भारतात परतल्यावर अटकेची भीती असल्याने त्यांना सुरक्षा हवी आहे."
भारत-थायलंड प्रत्यार्पण संधी
भारत आणि थायलंडमध्ये १९८२ पासून प्रत्यार्पण व्यवस्था आहे, जी २०१३ मध्ये अधिकृत करार म्हणून मजबूत करण्यात आली. २९ जून २०१५ पासून ही संधी अंमलात आहे. यामुळे दहशतवाद, आर्थिक गुन्हे किंवा आंतरराष्ट्रीय गुन्हे केलेल्या व्यक्तींना दोन्ही देश एकमेकांच्या स्वाधीन करू शकतात.