लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 11:43 IST2025-12-12T11:42:24+5:302025-12-12T11:43:11+5:30
Goa Birch Nightclub Owner Money Laundering: सुरक्षेचे नियम पायदळी तुडवल्यामुळे २५ जणांचा मृत्यू आणि आता ४२ शेल कंपन्यांचे जाळे समोर आल्यामुळे, हे प्रकरण केवळ दुर्घटनेचे नसून, एका मोठे गुन्हेगारी आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या कटाचे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
गोव्यातील 'बर्च' नाइटक्लबमधील भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर क्लबचे मालक असलेले लूथरा बंधू – सौरभ आणि गौरव लूथरा – यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या आगीतील मृतांचा आकडा २५ वर पोहोचला असताना, आता तपास यंत्रणांनी त्यांच्यावर ४२ शेल कंपन्यांचे (बनावट कंपन्या) नेटवर्क चालवल्याचा गंभीर संशय व्यक्त केला आहे.
या ४२ कंपन्या एकाच पत्त्यावर (नॉर्थ वेस्ट दिल्ली, हडसन लाइन) नोंदणीकृत असून, त्यांचा वापर केवळ कागदोपत्री व्यवहार आणि मनी लाँडरिंगसाठी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोवा आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त तपासात हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
६ डिसेंबर रोजी रात्री १:१७ वाजता बर्च क्लबमध्ये आग लागल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत लूथरा बंधूंनी थायलंडसाठी विमान तिकीट बुक केले आणि पहाटे ५:३० वाजता ते देश सोडून गेले होते. गोवा पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालय आणि सीबीआयच्या माध्यमातून इंटरपोलकडे 'ब्लू कॉर्नर नोटीस' जारी केल्यानंतर या दोघांना थायलंडमध्ये अटक करण्यात आली. दिल्लीच्या रोहिणी कोर्टात त्यांनी "व्यवसायासाठी थायलंडला गेलो होतो" असे सांगत अग्रिम जामीन मागितला, पण गोवा कोर्टाने आधीच 'नॉन-बेलेबल वॉरंट' जारी केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी कोर्टाला दिली. या प्रकरणात आतापर्यंत क्लबचे व्यवस्थापक, बार मॅनेजर आणि गेट मॅनेजरसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
४२ कंपन्यांचे गूढ आणि मनी लाँडरिंगचा संशय
तपास अधिकाऱ्यांच्या मते, दिल्लीतील एकाच पत्त्यावर नोंदणीकृत असलेल्या या ४२ शेल कंपन्यांचा कोणताही प्रत्यक्ष व्यवसाय दिसत नाही. या कंपन्यांचा उद्देश बेनामी व्यवहार करणे असू शकतो. यामुळे, लूथरा बंधूंवर आता 'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट' अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. गोवा पोलिसांनी या सर्व कंपन्यांच्या बँक खात्यांची आणि मागील व्यवहारांची कसून छाननी सुरू केली आहे.
सुरक्षेचे नियम पायदळी तुडवल्यामुळे २५ जणांचा मृत्यू आणि आता ४२ शेल कंपन्यांचे जाळे समोर आल्यामुळे, हे प्रकरण केवळ दुर्घटनेचे नसून, एका मोठे गुन्हेगारी आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या कटाचे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.