चिमुकलीला मिळणार शेतकऱ्याचे हृदय, अपघातात ब्रेनडेड शेतकऱ्याचे अंगदान, दोन जणांना जीवनदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 07:11 IST2021-12-01T07:10:44+5:302021-12-01T07:11:48+5:30
Organ Donation: मुंबईच्या एका रुग्णालयात मृत्यूशी लढणाऱ्या एका पाचवर्षीय चिमुकलीचे प्राण वाचण्याची आशा पल्लवित झाली आहे. या मुलीला एका ४१ वर्षीय शेतकऱ्याचे हृदय प्रत्याराेपित करण्यात येणार आहे.

चिमुकलीला मिळणार शेतकऱ्याचे हृदय, अपघातात ब्रेनडेड शेतकऱ्याचे अंगदान, दोन जणांना जीवनदान
इंदूर : मुंबईच्या एका रुग्णालयात मृत्यूशी लढणाऱ्या एका पाचवर्षीय चिमुकलीचे प्राण वाचण्याची आशा पल्लवित झाली आहे. या मुलीला एका ४१ वर्षीय शेतकऱ्याचे हृदय प्रत्याराेपित करण्यात येणार आहे. शेतकऱ्याचे मरणाेपरांत अंगदान करण्यात आले. त्यामुळे या मुलीसह आणखी चार जणांना नवजीवन मिळणार आहे.
इंदूरच्या शासकीय महात्मा गांधी स्मृती चिकित्सा महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. संजय दीक्षित यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ही एक दुर्लभ शस्त्रक्रिया असेल. मुंबईत उपचार घेत असलेल्या मुलीचे हृदय आणि आजूबाजूचे अवयवांची जागा असामान्य पद्धतीने माेठी झाली आहे, तर अंगदान करणाऱ्या शेतकऱ्याच्या हृदयाचा आकार लहान आहे. त्यामुळे वयस्क व्यक्तीचे हृदय प्रत्याराेपित करण्याची शक्यता बळावली.
अपघातात जखमी झाले हाेते शेतकरी
खुमसिंह साेळंकी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचे हृदय मुंबईला हवाई मार्गाने पाठविण्यात आले. साेळंकी हे २८ नाेव्हेंबरला रस्ते अपघातात गंभीररीत्या जखमी झाले हाेते. त्यांना मंगळवारी ब्रेन डेड जाहीर करण्यात आले.
आपले दु:ख सारून कुटुंबीय त्यांच्या अंगदानासाठी सहमत झाले. साेळंकी यांचे लिव्हर आणि दाेन किडनी इंदूर येथील तीन गरजू रुग्णांना देण्यात येत आहेत, तर फुप्फुसे हैदराबाद येथील एका रुग्णाला देण्यात येणार आहेत. (वृत्तसंस्था)