सखोल अंतराळ संशोधनासाठी सज्ज व्हा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 06:23 IST2025-08-24T06:23:00+5:302025-08-24T06:23:34+5:30
Narendra Modi News: भारतीय शास्त्रज्ञांनी मानवी भवितव्य उजळवणाऱ्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी सखोल अंतराळ संशोधन मोहिमेची तयारी करावी, असे आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त केले.

सखोल अंतराळ संशोधनासाठी सज्ज व्हा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
नवी दिल्ली - भारतीय शास्त्रज्ञांनी मानवी भवितव्य उजळवणाऱ्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी सखोल अंतराळ संशोधन मोहिमेची तयारी करावी, असे आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त केले.
व्हिडिओ संदेशाद्वारे संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, ‘‘आपण चंद्र आणि मंगळ गाठले आहे. आता अंतराळातील गूढ रहस्यांकडे पाहायचे आहे, जिथे मानवतेच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरणारी अनेक रहस्ये लपलेली आहेत. भविष्यातील मोहिमांसाठी भारत स्वतःची अंतराळवीरांची फळी उभारणार आहे आणि युवांना त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करतो.’’
‘अंतराळ क्षेत्रात कोणतीही अंतिम सीमा नसावी’
‘आपल्या क्षितिजांच्या पलीकडे आकाशगंगेच्या पलीकडे आहे, अंतहीन विश्व आपल्याला सांगते की कोणतीही सीमा अंतिम सीमा नाही आणि अंतराळ क्षेत्रातही, धोरणात्मक पातळीवर, कोणतीही अंतिम सीमा नसावी,’ असे पंतप्रधानांनी देशभरातील अवकाश शास्त्रज्ञ, विद्यार्थी व धोरणकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितले. भारत अवकाश तंत्रज्ञानाकडे केवळ वैज्ञानिक शोधाचे साधन म्हणून पाहत नाही तर जीवनमान सुलभ करण्यासाठीदेखील एक साधन म्हणून पाहतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारत स्पेस स्टेशन उभारणार
पंतप्रधानांनी सांगितले की, भारत विद्युत प्रेरण (इलेक्ट्रिक प्रोपल्शन) आणि अर्ध-क्रायोजेनिक इंजिन यांसारख्या क्रांतिकारी तंत्रज्ञानात प्रगती करत आहे. ‘लवकरच गगनयान मोहीम राबवली जाईल आणि भारत स्वतःचे स्पेस स्टेशन उभारेल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोदी यांनी खासगी क्षेत्रालाही पुढे येण्याचे आवाहन करत विचारले, ‘ स्टार्टअप्स पुढील पाच वर्षांत युनिकॉर्न बनू शकतील का? आपण दरवर्षी ५० रॉकेट्स प्रक्षेपित करण्याच्या पातळीवर पोहोचू शकतो का?’
त्यांनी नमूद केले की अवकाश तंत्रज्ञान केवळ वैज्ञानिक संशोधनापुरते मर्यादित नाही. मोदी यांनी तीन दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर तिरंगा फडकावणारे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची भेट घेतल्याचे सांगितले आणि त्यांच्या धैर्य व नव्या भारताच्या युवकांच्या असीम स्वप्नांचे कौतुक केले.