Russia-Ukraine War | 'युक्रेनमधील भारतीयांना आणण्यासाठी हवाई दलाची मदत घेऊ!'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 12:07 IST2022-03-03T11:58:14+5:302022-03-03T12:07:33+5:30
वेळप्रसंगी हवाई दलाची मदतही घेतली जाणार....

Russia-Ukraine War | 'युक्रेनमधील भारतीयांना आणण्यासाठी हवाई दलाची मदत घेऊ!'
पुणे: युक्रेनमध्ये २० हजार भारतीय अडकून पडले (indians stuck in ukraine) होते. त्यापैकी चार हजार नागरिक युद्धाला तोंड फुटण्याआधीच २४ फेब्रुवारी रोजी भारतात परतले. तर नऊ हजार नागरिकांनी युक्रेनची सीमा ओलांडली असून, आजुबाजूच्या युरोपीय देशांत आसरा घेतला आहे. याशिवाय अद्यापही तब्बल सात हजार नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत (ukraine crisis). अडकलेल्या नागरिकांना भारतात आणण्यासाठी खासगी विमान कमी पडत असून, वेळप्रसंगी हवाई दलाची मदतही घेतली जाणार आहे, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी बुधवारी पुण्यात दिली.
दिशा समितीच्या बैठकीसाठी परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन पुणे दौऱ्यावर आले होते. या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. युक्रेनमध्ये २० हजार भारतीय अडकले होते. त्यापैकी चार हजार नागरिक २४ फेब्रुवारीला भारतात परतले. उर्वरित १६ हजार नागरिकांपैकी नऊ हजार जणांनी युक्रेनची सीमा ओलांडून पोलंड, स्लोव्हाकिया, रोमानिया या लगतच्या देशांत आसरा घेतला आहे. व्यावसायिक विमानांची मर्यादित क्षमता पाहता हवाईदलाची मदत घेण्यात येणार आहे.
भारतीय दूतावासाकडून वेळोवेळी सूचना
युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनमध्ये संचारबंदी होती. त्यामुळे भारतीयांना बंकरमध्ये राहण्याच्या सूचना दूतावासाकडून देण्यात आल्या होत्या. प्रत्येक शहरातील परिस्थिती वेगळी असल्याने संचारबंदी शिथिल ओलांडण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. तसेच युक्रेनच्या पूर्वेकडे न जाता पश्चिम सीमेकडे जाण्याच्या सूचनाही दिल्या. युक्रेनच्या लगतच्या चार युरोपिय देशांत भारत सरकारकडून नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. कक्षाचा पत्ता, संपर्क क्रमांक युक्रेनमधील भारतीयांना देण्याची व्यवस्था केली आहे, असेही मुरलीधरन यांनी सांगितले.