जयपूर-अजमेर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास सावरदा पुलाजवळ भीषण अपघात झाला. गॅस सिलिंडरने भरलेल्या एका ट्रकला धडक दिल्यानंतर केमिकल टँकर पलटी झाला, ज्यामुळे लागलेल्या आगीमुळे गॅस सिलिंडरांचे सलग स्फोट झाले. या भयंकर दुर्घटनेत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सुमारे २० हून अधिक वाहने आगीच्या भक्षस्थानी आल्याची भीती व्यक्त होत आहे. स्फोटांमुळे परिसरात हडकंप माजला होता आणि आकाशात धुराचे मोठे लोट दूरवर दिसत होते.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर-अजमेर हायवेवर दोन ट्रकमध्ये समोरून टक्कर झाली. टक्कर झाल्यानंतर एका ट्रकला भीषण आग लागली आणि त्याचवेळी गॅस सिलिंडरने भरलेला दुसरा टँकर पलटी झाला. टँकर पलटी होताच आग आणखी भडकली आणि सिलिंडरांमध्ये जोरदार स्फोट होऊ लागले. हे स्फोट इतके भयानक होते की त्यांचा आवाज जवळपास १० किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर अनेक सिलिंडर उडून आजूबाजूच्या शेतात आणि परिसरात पडल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
या दुर्घटनेनंतर अफरातफरी आणि भीतीचे वातावरण पसरले. जयपूरचे जिल्हाधिकारी जितेंद्र कुमार सोनी यांनी या अपघाताची माहिती दिली असून, एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.
हायवेवर वाहनांची मोठी रांग, मदतकार्य युद्धपातळीवर
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस दल आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी दूदू, बगरू आणि किशनगढ येथून अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या बोलावण्यात आल्या. या भीषण अपघातामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून हायवेवरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे थांबवली आहे, ज्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
अपघातग्रस्त ट्रकाचा चालक आणि खलाशी अद्याप बेपत्ता असून, पोलीस आणि मदत पथके त्यांचा शोध घेत आहेत. मोखमपुरा पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान रात्रभर आग विझवण्यासाठी आणि बचावकार्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त, उपमुख्यमंत्र्यांची धाव
राज्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुःखद घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी आणि एसपी यांच्याशी फोनवरून चर्चा करून सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, दुर्घटनेतील बाधितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन मुख्यमंत्री शर्मा यांनी उपमुख्यमंत्री डॉ. प्रेम चंद बैरवा यांना तातडीने घटनास्थळी पाठवले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावरून माहिती दिली की, ते तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले असून, पोलीस, प्रशासन आणि अग्निशमन विभागाचे पथक मदत आणि बचावकार्यात गुंतले आहेत.
Web Summary : Jaipur-Ajmer highway gas tanker explosion killed one, ignited vehicles. Cylinders exploded across 10km, causing widespread panic. Firefighters are battling the blaze.
Web Summary : जयपुर-अजमेर हाईवे पर गैस टैंकर फटने से एक की मौत, गाड़ियां जल गईं। 10 किमी तक सिलेंडर फटे, दहशत। दमकल कर्मी आग बुझा रहे हैं।