आधी बोगस डॉक्टर, नंतर जादूटोण्यावर ठेवला विश्वास; तापाने फणफणलेल्या ३ मुलांनी गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:21 IST2025-11-18T15:20:03+5:302025-11-18T15:21:03+5:30
बोगस डॉक्टर आणि जादूटोण्यावर विश्वास ठेवल्यामुळे एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू झाला.

फोटो - आजतक
छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यातील अमलीपाडा सामुदायिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या धनौरा गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बोगस डॉक्टर आणि जादूटोण्यावर विश्वास ठेवल्यामुळे एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे आणि आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
धनौरा येथील रहिवासी डमरुधर नागेश आपल्या कुटुंबासह उदंती अभयारण्यात असलेल्या साहेबीनकछार येथील आपल्या सासरच्या घरी मका कापणीसाठी गेला होता. आठवडाभर तिथे राहिल्यादरम्यान, त्यांच्या तीन मुलांची प्रकृती अचानक बिघडली. मुलांना ताप आल्यावर डमरुधरने स्थानिक बोगस डॉक्टरकडे मुलांना नेलं आणि उपचार केले.
परिस्थिती बिकट होत असल्याचं पाहून कुटुंब गावी परतलं, परंतु रुग्णालयात जाण्याऐवजी त्यांनी जादूटोण्यावर विश्वास ठेवला. गावकऱ्यांना मुलांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यावर त्यांनी त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला, परंतु कुटुंबाने त्याकडे दुर्लक्ष केलं. याचे परिणाम भयानक होते. ११ नोव्हेंबर रोजी ८ वर्षीय अनिता हिचा सर्वात आधी मृत्यू झाला. १३ नोव्हेंबर रोजी ७ वर्षीय मुलाचाही मृत्यू झाला आणि काही तासांनंतर त्याच दिवशी ४ वर्षीय गोरेश्वरचाही मृत्यू झाला.
तीन मुलांच्या सलग मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे आणि लोक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. या आजाराबद्दल गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाने हे प्रकरण गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. यू. एस. नवरत्न यांच्या मार्गदर्शनाखाली तीन सदस्यीय तपास पथक स्थापन केलं आहे. पथक गावात पोहोचले आहे आणि मृत्यूचे कारण शोधत आहे.
अधिकाऱ्यांन दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील आरोग्य सुविधा अत्यंत खराब आहेत, त्यामुळे गावकऱ्यांना बोगस डॉक्टर आणि पारंपारिक उपचारांवर अवलंबून राहावं लागत आहे. या गावात यापूर्वी जादूटोण्यामुळे लोकांचा मृत्यू झाला. जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणाले की, रायपूर येथील एक विशेष पथक गावाला भेट देऊन सविस्तर चौकशी करेल. आधुनिक औषधांवर लोकांचा विश्वास वाढविण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आरोग्य विभाग या आदिवासीबहुल भागात जनजागृती कार्यक्रम सुरू करण्याची तयारी करत आहे.