गँगस्टर रवी पुजारीला सेनेगलमधून अटक; प्रत्यार्पणासाठी चर्चा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 00:26 IST2019-02-01T00:03:57+5:302019-02-01T00:26:39+5:30
बंगळुरू पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर अटकेची कारवाई

गँगस्टर रवी पुजारीला सेनेगलमधून अटक; प्रत्यार्पणासाठी चर्चा सुरू
मुंबई: गँगस्टर रवी पुजारीला पूर्व आफ्रिकेतील सेनेगलमध्ये अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय तपास यंत्रणा रवी पुजारीवर नजर ठेवून होत्या. काही दिवसांपूर्वी तो बुर्किनो फासोमध्ये होता, अशी माहिती यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर बंगळुरु पोलिसांनी त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यानंतर लगेचच सेनेग पोलिसांनी रवी पुजारीला अटक केली. यानंतर आता भारत सरकार सेनेगलसोबत प्रत्यार्पणाबद्दल चर्चा करत आहे. रवी पुजारीविरोधात भारतात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
गेल्या वर्षी जूनमध्ये गुजरातमधील आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी रवी पुजारी विरोधात तक्रार दाखल केली होती. पुजारीनं जीवे मारण्याची धमकी दिल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं. फोन कॉल आणि मेसेजच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मेवाणी यांना धमकावणाऱ्या व्यक्तीनं स्वत:चं नाव रवी पुजारी असल्याचं म्हटलं होतं. याआधी रवी पुजारीनं अनेक बॉलिवूड कलाकारांना धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे बॉलिवूडमध्ये बहुतांश कलाकार पुजारीला घाबरतात, असं म्हटलं जातं. रवी पुजारीच्या इशाऱ्यांवरुन त्याचे गुंड कलाकारांना धमकावतात. रवी पुजारीच्या गुंडांनी दिग्दर्शक महेश भट्ट यांनादेखील मारण्याचा प्रयत्न केला होता.
याआधी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या टीमनं रवी पुजारीचा सर्वात मोठा खबरी असलेल्या आकाश शेट्टीला कर्नाटकमधून अटक केली. यासाठी गेल्या आठवड्याभरापासून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय सावंत, सचिन कदम यांच्या दोन टीम मंगळुरुत होत्या. 25 जानेवारीला एका लग्नासाठी शेट्टीला तिथे आला होता. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली. त्याआधी 15 जानेवारीला विल्यिम रॉड्रिग्सला अटक झाली. त्याच्या चौकशीतून शेट्टीचं नाव पुढे आलं होतं.