सामूहिक बलात्कार करून दोन दलित मुलींचा खून
By Admin | Updated: May 30, 2014 03:26 IST2014-05-30T03:26:15+5:302014-05-30T03:26:15+5:30
उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात दोन दलित किशोरवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याप्रकरणी एका कॉन्स्टेबलसह चौघांना अटक करण्यात आली

सामूहिक बलात्कार करून दोन दलित मुलींचा खून
बदायू: उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात दोन दलित किशोरवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याप्रकरणी एका कॉन्स्टेबलसह चौघांना अटक करण्यात आली. जिल्ह्यातील कटरा गावात बुधवारी दोन दलित किशोरवयीन मुलींवर कथित सामूहिक बलात्कार करून खून करण्यात आला. या दोघींचे मृतदेह एका झाडाला लोंबकळत असल्याचे आढळून आले होते. त्या दोघी चुलत बहिणी होत्या. एक १४ वर्षांची आणि दुसरी १५ वर्षांची होती. मंगळवारी रात्री त्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. राष्ट्रीय महिला आयोगाने घटनेची निंदा केली आहे. हा भयंकर गुन्हा आहे. आम्ही प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथक तिकडे पाठवले आहे, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या निर्मला सामंत म्हणाल्या. सरकारने महिलांना सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन दिले आहे; परंतु ते अद्याप पूर्ण झाले नाही. जोपर्यंत सरकार बलात्कार, छेडछाडीसारख्या गुन्ह्यांपासून मुलींना सुरक्षा प्रदान केल्याचे एकतरी उदाहरण दाखवत नाही, तोपर्यंत अशा घटना सुरूच राहतील, असेही सामंत म्हणाल्या. आम्हाला झाडावर दोन मृतदेह लोंबकळत असल्याचे आढळून आले. आम्ही एक कॉन्स्टेबल आणि इतर तिघांना अटक केली आहे, असे पोलीस अधीक्षक (शहर) मानसिंग चौहान म्हणाले. (वृत्तसंस्था)