दरोडेखोरांचा ननवर सामूहिक बलात्कार
By Admin | Updated: March 15, 2015 01:46 IST2015-03-15T01:46:44+5:302015-03-15T01:46:44+5:30
पोलीस दरोडेखोरांच्या टोळीतील सदस्यांचा शोध घेत असून अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. जिल्हाधिकारी पी.बी. सलीम यांनी ही माहिती दिली.

दरोडेखोरांचा ननवर सामूहिक बलात्कार
रानाघाट (कोलकाता) : नदिया जिल्ह्यातील गंगनापूर येथील कॉन्व्हेंटमध्ये शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी क्रौर्याची परिसीमा गाठत एका ननवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी परिसरात उमटले. संतप्त लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी रस्ते व रेल्वे वाहतूक जाम करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.
पोलीस दरोडेखोरांच्या टोळीतील सदस्यांचा शोध घेत असून अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. जिल्हाधिकारी पी.बी. सलीम यांनी ही माहिती दिली. ज्या कॉन्व्हेंटमध्ये ही काळीमा फासणारी घटना घडली ते रानाघाट उपविभागात आहे. शाळेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास दरोडेखोरांची ही टोळी शाळेत घुसली आणि त्यांच्यापैकी तीन-चार लोकांनी पीडित ननला पहिले त्रास दिला आणि नंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. या दरोडेखोरांनी कपाटात ठेवलेले १२ लाख रुपयेही लुटून नेले. (वृत्तसंस्था)
सकाळी संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळेच्या वसतिगृहातील अधिकाऱ्यांनी या वयस्कर ननला रानाघाट रुग्णालयात भरती केले.
या घटनेची इत्थंभूत माहिती मिळविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे संपूर्ण क्षेत्रात पसरले. संतप्त विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी राष्ट्रीय महामार्ग ३४ आणि सियालदाह-रानाघाट रेल्वे मार्गावर दुपारी १२ वाजतापासून चक्काजाम आंदोलन पुकारले. राज्याचे शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांनी या घटनेची तीव्र शब्दात निंदा करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.
दोषींवर कठोर कारवाई-मुख्यमंत्री
दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ननवरील सामूहिक बलात्काराचे हे प्रकरण धक्कादायक असल्याचे सांगून या घटनेच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘मी या अत्यंत धक्कादायक आणि अमानवीय घटनेची तीव्र शब्दात निंदा करते. आम्ही या प्रकरणाच्या सीआयडीमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारांविरुद्ध त्वरित आणि ठोस कारवाई केली जाईल.’ ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल