Rafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 09:25 IST2018-09-22T09:24:36+5:302018-09-22T09:25:35+5:30
फ्रान्सचे माजी अध्यक्ष ओलांद यांच्या विधानानंतर फ्रान्समध्ये खळबळ

Rafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली: राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन निर्माण झालेलं वादळ अद्याप शांत झालेलं नाही. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या विधानामुळे भारतासह फ्रान्समध्येही खळबळ माजल्यानंतर आता याबद्दल फ्रान्स सरकारनं स्पष्टीकरण दिलं आहे. राफेल विमान करारासाठी भारतीय कंपनीची निवड करण्यात फ्रान्स सरकारचा सहभाग नव्हता. या करारासाठी भारतीय कंपनीची निवड करण्याचा पूर्ण अधिकार फ्रान्समधील कंपनीला असल्याचं फ्रान्स सरकारनं आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.
राफेल डीलसाठी मोदी सरकारनं फक्त अनिल अंबानी यांच्या रिलायन्सचं नाव सुचवलं होतं. त्यामुळेच फ्रान्सच्या डॅसो एव्हिएशेन कंपनीकडे इतर कोणताही पर्याय नव्हता, असं विधान फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी केल्यानं एकच खळबळ उडाली. मोदींनी अनिल अंबानींच्या फायद्यासाठीच राफेल करार केला, अशी टीका यानंतर पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केली. मोदींनी वैयक्तिक रस घेऊन राफेल डीलमध्ये बदल केले, असा आरोप राहुल गांधींनी ओलांद यांच्या विधानानंतर केला. राहुल गांधींनी ओलांद यांचे आभार मानत मोदींवर निशाणा साधला. 'दिवाळखोर झालेल्या अनिल अंबानींसाठी मोदींनी कोट्यवधी रुपयांचा करार केला. त्यांनी देशाचा विश्वासघात केला. त्यांनी आपल्या देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहीदांचा अपमान केला,' अशा शब्दांमध्ये राहुल मोदींवर बरसले.
फ्रान्सवा ओलांद यांच्या विधानाचे पडसाद फ्रान्समध्येही पाहायला मिळाले. राफेल डीलमध्ये भारतीय कंपनीची निवड फ्रान्स सरकारकडून नव्हे, तर डॅसो एव्हिएशेनकडून करण्यात आली. डॅसो एव्हिएशेनला आपली भागीदार कंपनी निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं स्पष्टीकरण फ्रान्स सरकारनं ओलांद यांच्या विधानानंतर दिलं. डॅसो एव्हिएशेनला भारतामधील भागीदार कंपनीची निवड करण्याचं स्वातंत्र्य होतं आणि फ्रान्सच्या कंपनीनं रिलायन्सच्या रुपात सर्वोत्तम पर्यायाची निवड केली, असंदेखील फ्रान्स सरकारनं स्पष्टीकरणात म्हटलं.