वक्फ विधेयकावरून जम्मू काश्मीर विधानभवनात फ्री स्टाईल हाणामारी; भाजपा-AAP आमदार भिडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:27 IST2025-04-09T12:26:52+5:302025-04-09T12:27:36+5:30
आपच्या नेत्याने सभागृहात वादग्रस्त टिप्पणी केली असा आरोप भाजपा आमदारांनी लावला. त्यावरून दोन्ही पक्षात संघर्ष निर्माण झाला.

वक्फ विधेयकावरून जम्मू काश्मीर विधानभवनात फ्री स्टाईल हाणामारी; भाजपा-AAP आमदार भिडले
जम्मू - वक्फ सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यापासून देशभरात त्याविरोधात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच जम्मू काश्मीर विधानसभेत पुन्हा एकदा जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टीच्या आमदारांमध्ये झटापट झाली. हा वाद इतका वाढला की दोन्ही पक्षाच्या आमदारांनी फ्री स्टाईल हाणामारीही केली. दुसरीकडे नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. वक्फ कायद्यावर सभागृहात चर्चेची मागणी सुरू होती.
वक्फ कायद्यावर चर्चा करा अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी केली. त्यावर भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी विरोध केला. वक्फ कायद्यावर चर्चा करावी यासाठी जम्मू काश्मीर विधानसभेत गोंधळ उडाला आणि त्यावरून सभागृह ३ तास स्थगित करण्यात आले. विधानसभा प्रवेश द्वारावर भाजपा आणि आपचे आमदार एकमेकांना भिडले. या दोन्ही पक्षातील आमदारांमध्ये झटापट झाली. आपच्या नेत्याने सभागृहात वादग्रस्त टिप्पणी केली असा आरोप भाजपा आमदारांनी लावला. त्यावरून दोन्ही पक्षात संघर्ष निर्माण झाला.
#WATCH | Jammu: AAP MLA Mehraaj Malik gets into a heated argument with BJP MLAs in the J&K legislative assembly. pic.twitter.com/d6Xd1APRCt
— ANI (@ANI) April 9, 2025
या गोंधळावर भाजपा आमदार म्हणाले की, आपचे नेते माध्यमांसमोर बोलताना हिंदूंविरोधात अपमानास्पद भाषेचा वापर करत होते. विधानसभेचे कामकाज पाहायला आलेल्या पीडीपी कार्यकर्त्यांनीही मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणीवरून आप कार्यकर्त्यांशी भिडले असं सांगितले. तर भाजपाच्या लोकांनी आमच्यावर हल्ला केला असा आरोप आपचे आमदार मेहराज मलिक यांनी केला. विधानभवन परिसरात या गोंधळामुळे चांगलाच तणाव निर्माण झाला होता.
नेमकं काय घडलं?
विधानसभेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात मेहराज मलिक आणि पीडीपी आमदार वहीद पारा यांच्यात वाद होताना दिसत आहे. तू समाजासोबत गद्दारी केलीय, मेहराज घाबरेल असं तुला वाटते, पण एकालाही सोडणार नाही असं मेहराज मलिक यांनी धमकी दिली त्याशिवाय भाजपा आमदारांनी गुंडगिरी केली असा आरोप मेहराज मलिक यांनी केला. मेहराज मलिक डोडा जागेवरून निवडून आले आहेत ते आम आदमी पक्षाचे एकमेव आमदार आहेत.
#WATCH | Jammu: AAP MLA Mehraaj Malik gets into a heated argument with PDP MLA Waheed Para inside the J&K legislative assembly. pic.twitter.com/O5AX1MO7ff
— ANI (@ANI) April 9, 2025