रॉबर्ट वाड्रा यांना बाजू मांडण्यास चार आठवडे, हवाला व्यवहाराचे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 00:26 IST2019-08-22T00:26:26+5:302019-08-22T00:26:45+5:30
न्यायमूर्ती मनमोहन आणि संगीता धिंग्रा सेहगल यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी आता १८ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.

रॉबर्ट वाड्रा यांना बाजू मांडण्यास चार आठवडे, हवाला व्यवहाराचे प्रकरण
नवी दिल्ली : रॉबर्ट वाड्रा यांनी हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्यातील (पीएमएलए) काही तरतुदी रद्द करण्याच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिलेल्या उत्तरावर म्हणणे मांडण्यास वाड्रा यांना दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी त्यांना चार आठवड्यांचा वेळ दिला.
न्यायमूर्ती मनमोहन आणि संगीता धिंग्रा सेहगल यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी आता १८ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. वाड्रा यांचे वकील के. टी. एस. तुलसी यांनी ईडीच्या उत्तरावर भूमिका मांडण्यास आम्हाला काही वेळ हवा असून, दस्तावेज जवळपास पूर्ण झाले आहेत, असे म्हटले. वाड्रा यांनी उच्च न्यायालयात केलेल्या आपल्या याचिकेत वस्तुस्थिती दडपून टाकली, असा दावा ईडीने केला होता; परंतु वाड्रा यांच्या बाजूने तसे काहीही झालेले नाही, असे तुलसी म्हणाले.
‘ते ईसीआयआरची (एन्फोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट) प्रत देत नाहीत आणि ते म्हणतात की, वस्तुस्थिती दडवली. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी ईसीआयआरची प्रत मला दिली. माहिती असलेली वस्तुस्थिती मी उघड केली. माझ्याकडून काहीही लपवून ठेवले गेले नाही’, असे तुलसी म्हणाले. रॉबर्ट वाड्रा यांच्या जवळचे सहकारी मनोज अरोरा यांनीही हवाला व्यवहाराचे प्रकरण रद्द करण्याची मागणी केली आहे.