दक्षिण काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत 4 दहशतवादी ठार, चकमक अजूनही सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 18:56 IST2021-11-17T18:54:04+5:302021-11-17T18:56:17+5:30
या वर्षात आतापर्यंत एकूण 139 दहशतवादी मारले गेले

दक्षिण काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत 4 दहशतवादी ठार, चकमक अजूनही सुरू
श्रीनगर: बुधवारी सायंकाळी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात भारतीय सैन्याची दहशतवाद्यांसोबत चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. परिसरात चकमक अद्यापही सुरुच असल्याची माहिती आहे. सुरक्षा दलाच्या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलाकडूनही गोळीबार करण्यात आला.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील कुलगाममधील पोम्बे भागात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर दहशतवाद्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली. या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला सुरक्षा दलाकडूनही गोळीबाराने प्रत्युत्तर देण्यात आले. यादरम्यान चार दहशतवादी ठार झाले, अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. तिकडे पुलवामा पोलिस आणि सुरक्षा दलाच्या हाती मोठे यश आले आहे. लष्कराचे 2 दहशतवादी अमीर बशीर आणि मुख्तार भट यांना पुलवामा पोलिस आणि सुरक्षा दलांनी नाकाबंदीदरम्यान अटक केली. त्यांच्याकडून आयईडी जप्त करण्यात आली आहे.
या वर्षात आतापर्यंत एकूण 139 दहशतवादी मारले गेले
काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये आत्मघातकी बॉम्बरचा समावेश होता, पोलिसांनी ही माहिती दिली. या वर्षात आतापर्यंत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या 139 वर पोहोचली आहे. दरम्यान, दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक हिजबुल मुजाहिद्दीनचा जिल्हा कमांडर होता.