Mahakumbh Stampede: महाकुंभ चेंगराचेंगरीतील मृतांमध्ये बेळगावमधील माय-लेकीसह चौघे; कुटुंबियांना सकाळीच समजलेले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 20:53 IST2025-01-29T20:53:04+5:302025-01-29T20:53:32+5:30
Mahakumbh Stampede Death Count: बेळगावमधून काही ट्रॅवल बसद्वारे एक ग्रुप महाकुंभला गेला होता. हे लोक संगमावर ब्रम्ह मुहूर्ताची वाट पाहत थांबले होते.

Mahakumbh Stampede: महाकुंभ चेंगराचेंगरीतील मृतांमध्ये बेळगावमधील माय-लेकीसह चौघे; कुटुंबियांना सकाळीच समजलेले...
उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्याज आज पहाटे भीषण गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. स्नानासाठी ब्रम्हमुहूर्ताची वाट पाहणाऱ्या भाविकांवर बॅरिकेड तोडून लोकांचा लोंढा आल्याने यात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश प्रशासनाने तब्बल २० तासांनी मृतांचा आकडा जाहीर केला आहे. यात बेळगावच्या ४ जणांचा समावेश आहे.
बेळगावमधून काही ट्रॅवल बसद्वारे एक ग्रुप महाकुंभला गेला होता. हे लोक संगमावर ब्रम्ह मुहूर्ताची वाट पाहत थांबले होते. अनेकजण झोपलेले देखील होते. अचानक गर्दी वाढली आणि लोकांनी बॅरिकेडिंग ओलांडून झोपलेल्या लोकांकडे धाव घेतली. यात झालेल्या चेंगराचेंगरीत बेळगावमधील मायलेकीसह चौघांचा मृत्यू झाला.
यामध्ये बेळगाव शहरातील वडगावच्या भाजपा कार्यकर्त्या ज्योती हट्टारवाड (५०) आणि त्यांची १६ वर्षांची मुलगी मेघा हट्टारवाड यांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. यांच्यासह महादेवी भवनूर आणि अरुण या दोघांचाही यात मृत्यू झाला. त्यांच्यासोबत गेलेल्या इतर भाविकांनी याची माहिती मृतांच्या नातेवाईकांना दिली होती.
हट्टारवाड़ यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, २६ जानेवारीला एका खासगी ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून बसद्वारे माय लेक प्रयागराजला गेल्या होत्या. त्यांच्यासोबत १३ जण होते. जखमी अवस्थेत त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतू, त्यांचा उपचारावेळी मृत्यू झाला.
मृतांपैकी २५ जणांची ओळख पटली असून गुजरात आणि आसामच्या एका भाविकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. अद्याप सर्व मृतांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. या घटनेत अनेकांनी आपल्या कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती गमावल्या आहेत. रेल्वेने प्रयागराजच्या दिशेने रिकाम्या रेल्वे गाड्या सोडल्या आहेत. जे भाविक परतत आहेत त्यांना गर्दीमुळे त्रास होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या वारसांना २५ लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे.