चकमकीत चार अतिरेकी ठार, अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षादलाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 04:31 IST2020-03-16T04:30:11+5:302020-03-16T04:31:06+5:30
अनंतनाग जिल्ह्यात हे अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी तपास मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी अतिरेक्यांनी सुरक्षादलावर गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने चारही अतिरेक्यांना ठार मारले.

चकमकीत चार अतिरेकी ठार, अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षादलाची कारवाई
श्रीनगर : काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात रविवारी झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने चार अतिरेक्यांना ठार मारले. पोलिसांनी ही माहिती दिली.
अनंतनाग जिल्ह्यात हे अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी तपास मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी अतिरेक्यांनी सुरक्षादलावर गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने चारही अतिरेक्यांना ठार मारले. दक्षिण काश्मीरच्या दियालगाम भागात ही चकमक घडली.
दुसऱ्या घटनेत कठुआ जिल्ह्यात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार केला. आंतरराष्ट्रीय सीमेवर चौक्यांवर रात्रभर हा गोळीबार सुरू होता. यात भारताच्या बाजूने कोणतीही हानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बीएसएफने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर
दिले. (वृत्तसंस्था)
हिरानगर सेक्टरच्या मन्यारी- चोरगली भागांत दोन्ही बाजूंनी रात्रभर गोळीबार झाला. रविवारी सकाळी ४.३० वाजेपर्यंत हा गोळीबार सुरू होता.
अतिरेक्याला अटक
काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात एका अतिरेक्याला पकडण्यात आले आहे. एका पोलीस अधिकाºयाने सांगितले की, दानिश ककरू, असे या अतिरेक्याचे नाव आहे.
तो बारामुल्लाच्या चिश्ती कॉलनीतील रहिवासी आहे. अन्य एका घटनेत कुलगाम जिल्ह्यात बाजारपेठेत दोन लोकांना पकडण्यात आले आहे. यातील एकाचे नाव परवेज अहमद मंटू आहे.