वाहन दरीत कोसळून चार जवानांचा मृत्यू; जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 06:32 IST2025-01-05T06:29:48+5:302025-01-05T06:32:32+5:30
पवन कुमार, हरिराम, जतिंदर कुमार आणि नतीश कुमार अशी मृत जवानांची नावे आहेत

वाहन दरीत कोसळून चार जवानांचा मृत्यू; जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात अपघात
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात शनिवारी खराब हवामान आणि खराब दृश्यमानतेमुळे भारतीय लष्कराचे वाहन रस्त्यावरून दरीत घसरल्याने चार लष्करी जवानांचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला. दोन आठवड्यांपेक्षा कमी अंतराने हा दुसरा मोठा अपघात झाला आहे. २४ डिसेंबर रोजीही पूंछ जिल्ह्यांत लष्करी वाहन ३५० फूट दरीत कोसळून पाच जवानांचा मृत्यू झाला होता.
पवन कुमार, हरिराम, जतिंदर कुमार आणि नतीश कुमार अशी मृत जवानांची नावे आहेत. लष्कराच्या चिनार कॉर्प्सने म्हटले आहे की, खराब हवामान व कमी दृश्यमानता यामुळे लष्करी वाहनाला हा अपघात झाला. नागरिकांनी तातडीने मदतकार्यास हातभार लावला. लष्कराने नागरिकांचे आभार मानले आहेत. (वृत्तसंस्था)
उपाययोजना करा : खरगे
या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी जवानांना श्रद्धांजली वाहिली. खराब हवामानामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन खरगे यांनी केले आहे.
भाजप नेत्यावर गोळीबार करणाऱ्यास अटक
पार्किंगच्या वादातून सरकारी कर्मचाऱ्याने भाजपच्या युवा नेत्यावर गोळीबार केला. रस्त्यावर भाजप नेते व ॲड. कणव शर्मा यांनी आपली गाडी उभी केली होती. यातून वाद झाला. दरम्यान रवींद्र याला अटक करण्यात आली आहे.