माजी पोलिस महानिरीक्षक IPS अमर सिंग चहल यांनी स्वतःवर झाडली गोळी; धक्कादायक कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 17:37 IST2025-12-22T17:37:42+5:302025-12-22T17:37:52+5:30
काही दिवसांपूर्वी हरियाणातील वरिष्ठ पोलिस अधिकारी वाय पूरण कुमार यांनी टोकाचे पाऊल उचलले होते.

माजी पोलिस महानिरीक्षक IPS अमर सिंग चहल यांनी स्वतःवर झाडली गोळी; धक्कादायक कारण...
Punjab News :पंजाबचे माजी IPS अधिकारी आणि निवृत्त आयजी अमर सिंग चहल यांनी कथितरित्या आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पटियालातील त्यांच्या निवासस्थानी ते गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांनी स्वतःवर गोळी झाडल्याची माहिती असून, सध्या त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांना घटनास्थळावरून सुसाईड नोट सापडली आहे, त्यात ऑनलाइन फसवणुकीमुळे झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीचा आणि मानसिक त्रासाचा उल्लेख आहे.
SSP वरुण शर्मा यांची माहिती
पटियालाचे एसएसपी वरुण शर्मा यांनी सांगितले की, गोळीबाराची माहिती मिळताच पोलिस पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि चहल यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. सुसाईड नोटमध्ये ऑनलाइन फसवणुकीमुळे झालेल्या आर्थिक हानीमुळे आपण प्रचंड तणावाखाली असल्याचे चहल यांनी नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले.
फरीदकोट गोळीबार प्रकरणाशी संबंधित पार्श्वभूमी
अमर सिंग चहल हे 2015 च्या फरीदकोट गोळीबार प्रकरणातील आरोपी होते. या प्रकरणात पंजाब पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) 2023 मध्ये माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल, सुखबीर सिंग बादल यांच्यासह अनेक पोलिस अधिकाऱ्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्या आरोपपत्रात चहल यांचे नावही समाविष्ट होते. त्या घटनेचा सखोल तपास सुरू असून, सर्व बाबी तपासल्या जात आहेत, असे पोलिसांनी सांगितले. सध्या चहल यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे बारकाईने लक्ष आहे.
याआधीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आत्महत्येच्या घटना
यापूर्वीही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून आत्महत्येचे प्रकार समोर आले आहेत. हरियाणातील वरिष्ठ पोलिस अधिकारी वाय पूरण कुमार यांनी चंदीगड येथील निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांनी लिहिलेल्या 8 पानांच्या सुसाईड नोटमध्ये डीजीपी, एडीजीपी आणि एसपी दर्जाच्या 10 अधिकाऱ्यांना जबाबदार धरले होते. या प्रकरणाने मोठी खळबळ उडवून दिली होती आणि उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली होती.