माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं नाव मतदारयादीतून हटवलं, नाही करू शकणार मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 18:33 IST2017-09-28T18:30:40+5:302017-09-28T18:33:20+5:30
माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव मतदार यादीतून हटवण्यात आलं आहे.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं नाव मतदारयादीतून हटवलं, नाही करू शकणार मतदान
लखनऊ - माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव लखनऊ महानगरपालिकेने मतदार यादीतून हटवलं आहे. त्यामुळे यापुढे लखनऊमध्ये होणा-या कोणत्याही निवडणुकांमध्ये ते मतदान करु शकणार नाहीत. अनेक वर्षांपासून लखनऊमध्ये न आल्यामुळे त्यांचं नाव मतदार यादीतून हटवण्यात आलं आहे.
मतदारयाद्यांच्या पुनर्निरीक्षण मोहिमेनंतर त्यांचं नाव यादीतून काढून टाकण्यात आल्याचं क्षेत्रीय अधिकारी अशोक कुमार सिंह यांनी स्पष्ट केलं. वाजपेयी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील बनारसी दास वॉर्डमधून मतदानाचा हक्क बजावायचे. त्यांनी 2004 च्या लोकसभा निवडणुकीत मतदान केले होते. मात्र त्यानंतर प्रकृती अस्वाथ्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही.
वाजपेयींनी दिलेल्या पत्त्यावर सध्या किसान संघाचे कार्यालय आहे. मतदारयादीतील पत्त्यानुसार वाजपेयी लखनऊमधील बासमंडी येथील घर क्रमांक 92/98-1 या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यांचा मतदार क्रमांक 1054 होता. मात्र, विभागीय अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाजपेयी गेल्या 10 वर्षांपासून शहरात आलेले नाहीत.
‘अटल बिहारी वाजपेयी यांनी महानगरपालिकेला बनारसी दास भागातील पत्ता दिला आहे. मात्र त्या पत्त्यावर ते अनेक वर्षांपासून राहत नाही. त्यामुळेच मतदारांची पडताळणी केल्यावर त्यांचे नाव मतदारयादीतून हटवण्यात आले,’ अशी माहिती महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी अशोक कुमार सिंह यांनी दिली.