माजी आमदाराच्या स्कॉर्पिओने 9 वर्षांच्या मुलीला चिरडलं; लोक संतापले, कार पकडली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 17:53 IST2023-09-11T17:52:20+5:302023-09-11T17:53:35+5:30
माजी आमदाराच्या स्कॉर्पिओने एका बाईकस्वाराला धडक दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामध्ये बाईकवर मागे बसलेल्या एका ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.

फोटो - आजतक
बिहारच्या पाटणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. माजी आमदाराच्या स्कॉर्पिओने एका बाईकस्वाराला धडक दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामध्ये बाईकवर मागे बसलेल्या एका ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. मुलीच्या मृत्यूनंतर संतापलेल्या लोकांनी धावत जाऊन गाडीचा पाठलाग केला आणि पकडलं. माजी आमदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अपघातानंतर ड्रायव्हर गाडी सोडून पळ काढत होता पण लोकांनी त्याला पकडलं.
मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली पोलीस ठाणे परिसरातली लोहिया चक्र पथचे माजी आमदार अनिल कुमार यांच्या स्कॉर्पिओने एका ९ वर्षांच्या मुलीला चिरडलं. यामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी यानंतर अनिल कुमार यांची गाडी थांबवली आणि गोंधळ घातला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी माजी आमदाराची गाडी जप्त केली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ अत्यंत वेगात होती. तिने एका बाईकला जोरदार धडक दिली. बाईकवर चालकासोबतच एक महिला आणि मुलगी देखील बसली होती. धडक होताच तिघेही खाली पडले. यानंतर स्कॉर्पिओने मुलीला चिरडलं. उपचारासाठी मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
माजी आमदार अनिल कुमार यांनी त्यांच्या गाडीने मुलीला चिरडलं नसल्याचं म्हटलं आहे. एका दुसऱ्या बाईकने मुलीला चिरडलं असं सांगितलं. मात्र घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्यांची गाडी जप्त केली आहे. तसेच माजी आमदाराला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून लोकांनी या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.