राजस्थानचे कोटा जिल्हा वन अधिकारी रवि मीणा यांच्या कानशिलात लगावणाऱ्या भाजपाच्या माजी आमदाराला न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यामुळे आता या माजी आमदारांना यापुढे निवडणूक लढविता येणार नाही. ही मारहाणीची घटना २०२२ मध्ये झाली होती.
सरकारी वकिलांनी सांगितले की, SC/ST न्यायालयाने, त्यांना IPC कलम 353 (लोकसेवकाला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी बळ) यासह संबंधित कलमांखाली दोषी ठरवताना, प्रत्येक दोषीला 20,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
यावर माजी आमदार भवानी सिंह राजावत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. SC/ST कायद्याच्या कलम 3 अंतर्गत आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
31 मार्च 2022 रोजी तत्कालीन उप वनसंरक्षक (DCF) रवी कुमार मीना यांच्या तक्रारीवरून, राजावत आणि त्यांचे सहकारी सुमन यांच्याविरुद्ध भादंवि कलम 332, 353, 34 आणि कलम 3(2) नुसार नयापुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांनाही तीन वर्षांचा कारावास आणि २०००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. पोलिसांनी भवानी राजावत आणि सुमन यांना अटक केली आणि राजस्थान उच्च न्यायालयातून जामीन मिळण्यापूर्वी त्यांना १० दिवस न्यायालयीन कोठडीत राहावे लागले होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.