दिल्लीत आपचा ‘दारु’ण पराभव; भाजपच्या मायक्रो-मॅनेजमेंटपुढे सर्व फासे उलटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 08:49 IST2025-02-09T08:48:09+5:302025-02-09T08:49:27+5:30

भ्रष्टाचाररहित राजकारणाचे आश्वासन दिलेेल्या ‘आप’चे १६ सदस्य भ्रष्टाचाराच्या आरोपातच तुरुंगात असल्याने आपकडे मतदारांची पाठ

Former CM Arvind Kejriwal's AAP party suffered a crushing defeat in the Delhi Assembly elections, BJP Won | दिल्लीत आपचा ‘दारु’ण पराभव; भाजपच्या मायक्रो-मॅनेजमेंटपुढे सर्व फासे उलटले

दिल्लीत आपचा ‘दारु’ण पराभव; भाजपच्या मायक्रो-मॅनेजमेंटपुढे सर्व फासे उलटले

चंद्रशेखर बर्वे 

नवी दिल्ली : मफलरमॅन अरविंद केजरीवाल यांनी आकर्षक घोषणांचा पाऊस पाडल्यानंतरही आम आदमी पक्षाचा दिल्लीतील किल्ला खेळाच्या पत्त्याप्रमाणे भुईसपाट झाला आहे. मात्र, केजरीवाल यांच्या कोणत्या चुकांमुळे  भाजपच्या हाती सत्तेची दोरी दिली, यावर चर्चा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी आपने पूर्ण जोर लावला होता. परंतु, भाजपच्या मायक्रो-मॅनेजमेंटपुढे आपचे फासे उलटे पडले. 

यमुनेचे प्रदूषण 

यमुना स्वच्छ करू असा दावा केजरीवाल यांनी केला होता. मात्र, यमुना स्वच्छ होण्याऐवजी दिवसेंदिवस प्रदूषित होत गेली. दिल्लीकरांना नळातून दूषित पाणी मिळू लागले होते. १० वर्षे दिल्लीच्या सत्तेत राहूनही आप सरकारला यमुना स्वच्छ करता आली नाही. अशातच, हरयाणावर पाण्यात विष मिसळविल्याचा आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी यमुनेचे पाणी पिऊन दाखविले. याचा फटका आपला बसला.

अर्थसंकल्पाचा मोठा वाटा 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मतदानाच्या चार दिवसाआधी सादर केलेल्या बजेटमध्ये १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा करून मध्यमवर्गाला मोठा दिलासा दिला होता. प्रवेश वर्मा यांनी ज्या नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल यांचा पराभव केला त्या मतदारसंघात केंद्र सरकारचे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर राहतात. यामुळे आपच्या पराभवात बजेटने सिंहाचा वाटा उचलला.

आपचे १६ सदस्य तुरुंगात

आपच्या पराभवाच्या कारणांत मंत्रिमंडळातील सदस्यांचे तुरुंगात जाणे हे पहिल्या क्रमांकावर ठेवावे लागेल. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, डॉ. सत्येंद्र जैन, सोमनाथ भारती व राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांच्यासह तब्बल १६ जणांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खावी लागली. भ्रष्टाचाररहित प्रामाणिक राजकारण करण्यासाठी  अरविंद केजरीवाल हे राजकारणात आले होते. 

‘एकला चलो रे’चा फटका

केजरीवाल यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करण्यापेक्षा ‘एकला चलो’चा मार्ग स्वीकारला. यामुळे काँग्रेसने सर्व ७० मतदारसंघात उमेदवार उतरविले. या निवडणुकीत काँग्रेसचा एकही उमेदवार विजयी झाला नसला तरी आपच्या मतांचे विभाजन करण्यात त्यांना यश आले आहे. थोडक्यात,  आघाडी न करता निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय आपला भोवला असे म्हणता येईल. केजरीवाल यांनी सत्ताविरोधी लाटेचा सामना करण्यासाठी २८ विद्यमान आमदारांचे तिकीट कापून नवीन चेहऱ्यांना मैदानात उतरविले. परंतु, याचा कोणताही फायदा पक्षाला झाला नाही. याउलट, ऐन निवडणुकीच्या तोंडावर आठ आमदार पक्ष सोडून भाजपात सामील झाले. केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या  योजनाही दिल्लीकरांच्या पसंतीस उतरल्या नाहीत. 

Web Title: Former CM Arvind Kejriwal's AAP party suffered a crushing defeat in the Delhi Assembly elections, BJP Won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.