'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 05:42 IST2025-12-14T05:41:56+5:302025-12-14T05:42:12+5:30
विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोठी कारवाई करताना भाजपचे माजी आमदार सुभाष गुत्तेदार, त्यांचा मुलगा आणि अन्य पाच जणांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
बंगळुरू: २०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान आळंद मतदारसंघात घडलेल्या कथित 'मत चोरी' प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोठी कारवाई करताना भाजपचे माजी आमदार सुभाष गुत्तेदार, त्यांचा मुलगा आणि अन्य पाच जणांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यादीतून ५,९९४ मतदारांची नावे बेकायदा वगळल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मतदारांची नावे कशी हटवली गेली, याची सविस्तर माहिती त्यात देण्यात आली आहे.
मुख्य आरोपी असलेले भाजपनेते सुभाष गुत्तेदार ४ वेळा आमदार राहिले आहेत. त्यांचा मुलगा हर्षानंद गुत्तेदार, स्वीय सहायक टिप्पेरुद्र, कलबुर्गीतील तीन डेटा सेंटर चालक अक्रम पाशा, मुकरम पाशा, मोहम्मद अशफाक आणि पश्चिम बंगालमधील बापी आद्या यांचा इतर आरोपींमध्ये समावेश आहे.
खोट्या प्रकरणात वडिलांना गोवण्यात आल्याचा दावा
सुभाष गुत्तेदार, त्यांचा मुलगा आणि स्वीय सहायक यांना यापूर्वीच अटकपूर्व जामीन देण्यात आला होता. हर्षानंद गुत्तेदार यांनी आरोप फेटाळून लावत आपल्याला आणि आपल्या वडिलांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा केला आहे.
उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी 'मत चोरी' विरोधात राज्यव्यापी मोहीम सुरू झाल्याचे सांगितले. याशिवाय दिल्लीतील रामलीला मैदानावर रविवारी राहुल गांधी यांच्या पुढाकाराने आंदोलन होत असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या मोहिमेचे नेतृत्व करत आहेत, असे शिवकुमार यांनी स्पष्ट केले.