कट रचून लीक केलं गेलं माजी लष्करप्रमुख नरवणे यांचं पुस्तक, तपासाचे धागेदोरे पोहोचले परदेशात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 07:48 IST2026-02-12T07:47:06+5:302026-02-12T07:48:46+5:30
Former Army Chief Manoj Naravane Book News: माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकावरून सध्या देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, नरवणे यांचं हे पुस्तक लीक करण्यामागे व्यापक कटकारस्थान असल्याची माहिती समोर येत आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अनिवार्य परवानगीशिवाय नियोजनबद्धरीत्या हे पुस्तक लीक करण्यात आले, अशी माहिती प्राथमिक तपासामधून समोर आल्याचा दावा सुत्रांनी केला आहे.

कट रचून लीक केलं गेलं माजी लष्करप्रमुख नरवणे यांचं पुस्तक, तपासाचे धागेदोरे पोहोचले परदेशात
माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकावरून सध्या देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पुस्तकातील काही मुद्दे अधोरेखित करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, नरवणे यांचं हे पुस्तक लीक करण्यामागे व्यापक कटकारस्थान असल्याची माहिती समोर येत आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अनिवार्य परवानगीशिवाय नियोजनबद्धरीत्या हे पुस्तक लीक करण्यात आले, अशी माहिती प्राथमिक तपासामधून समोर आल्याचा दावा सुत्रांनी केला आहे.
यासंदर्भातील वृत्त आज तकने प्रसारित केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पुस्तकाचं वितरण कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये झालं आहे. एवढंच नाही तर या देशांमध्येच हे पुस्तक सर्वप्रथम ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले. ही बाब लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गुन्हेगारी कृत्यांच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल केली आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती आता अमेरिका, कॅनडा, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियापर्यत पोहोचली आहे.
या पुस्तकाची लीक झालेली प्रत ही सर्वप्रथम .io डोमेन एक्सटेंशनवर अपलोड करण्यात आली होती. हा ब्रिटिश इंडियन ओशन टेरिटरीशी संबंधित कंट्री कोड डोमेन आहे. त्यानंतर हे पुस्तक इतर होस्टिंग प्लॅटफॉर्मवरही अपलोड केले गेले.
स्पेशल सेल आता या पुस्तकाच्या आयएसबीएन क्रमांकाचाही तपास करत आहे. आयएसबीएन म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर. हा १३ आकड्यांचा एक यूनिक डिजिटल कोड असतो. लीक झालेल्या आवृत्तीमध्ये जो आयएसबीएन क्रमांक मिळाला तो फोर स्टार ऑफ डेस्टिनी या नावाने प्रकाशित झालेल्या मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचाच असल्याचे सांगण्यात येत आहे. आता या कोडबाबत पेंग्विन इंडियाचीही चौकशी केली जात आहे.
दरम्यान, या संदर्भात करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमध्ये ऑनलाईन विक्री करत असलेल्या संकेतस्थळांवर जो आयएसबीएन कोड सापडला आहे तोसुद्दा पेंग्विन इंडियाकडून प्रसिद्ध झालेल्या याच पुस्तकाशी संबंधित असल्याचं दिसून आलं आहे.