परदेशी प्रवासी वाढवणार चिंता, काळजी घ्या!, विमानतळावर आढळले ११ कोरोनाग्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 06:23 IST2023-01-06T06:22:36+5:302023-01-06T06:23:03+5:30
ओडिशाच्या आरोग्य विभागाचे विशेष सचिव अजित कुमार मोहंती यांनी भारतात कोरोनाची चौथी लाट मार्चमध्ये येऊ शकते, असा इशारा दिला आहे.

परदेशी प्रवासी वाढवणार चिंता, काळजी घ्या!, विमानतळावर आढळले ११ कोरोनाग्रस्त
नवी दिल्ली : भारतात २४ डिसेंबर ते ३ जानेवारीदरम्यान आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या पडताळणीत ११ जणांना ओमायक्रॉनच्या उपप्रकारांची लागण झाल्याचे आढळून आले, परंतु ते भारतात आधीच अस्तित्वात आहेत, अशी माहिती गुरुवारी अधिकृत सूत्रांनी दिली. ओडिशाच्या आरोग्य विभागाचे विशेष सचिव अजित कुमार मोहंती यांनी भारतात कोरोनाची चौथी लाट मार्चमध्ये येऊ शकते, असा इशारा दिला आहे.
सूत्रानुसार या कालावधीत एकूण १९ हजार २२७ आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी १२४ जणांना कोरोना विषाणूची लागण
झाल्याचे आढळले. एक्सबीबी.१ सह एक्सबीबी उपप्रकार १० नमुन्यांमध्ये आढळला, तर एका नमुन्यात बीएफ ७.४.१ उपप्रकाराचा संसर्ग आढळला.
भारतात एका दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाची १८८ नवीन प्रकरणे समोर आली असून १६ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची एकूण संख्या २५५४ झाली आहे.
लसीकरणामुळे चौथ्या लाटेचा परिणाम नाही
- एका मॉडेलनुसार मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात भारतात चौथी कोविड लाट येऊ शकते.
- तथापि, प्रभावी लसीकरण स्थितीमुळे ताज्या लाटेचा भारतीयांवर परिणाम होण्याची शक्यता नाही, असा दावा ओडिशाच्या आरोग्य विभागाचे विशेष सचिव अजित कुमार मोहंती यांनी केला आहे.
- त्यांनी गर्दी टाळण्याचा व कार्यक्रमांमध्ये मास्क वापरण्याचा सल्ला दिला.