परदेशी नागरिकांनाही भारतात घेता येणार कोरोना लस, केंद्राने घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 20:01 IST2021-08-09T20:00:02+5:302021-08-09T20:01:57+5:30
Corona Vaccine: परदेशी नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

परदेशी नागरिकांनाही भारतात घेता येणार कोरोना लस, केंद्राने घेतला निर्णय
नवी दिल्ली: भारतात सध्या लसीकरण अभियान मोठ्या वेगाने सुरू आहे. आतापर्यंत 50 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. आता हे लसीकरण अभियान वाढण्याच्या दिशेने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, आता भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांनाही भारतात कोरोना लस घेता येणार आहे.
भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांची सुरक्षाही महत्वाची असल्याचे म्हणत केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना CoWin पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यावर रजिस्ट्रेशन करण्यासाठी भारतीय नागरिकांना आधार कार्डची गरज होती, पण परदेशी नागरिकांना त्यांच्या पोसपोर्टद्वारे यावर रजिस्ट्रेशन करता येईल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना व्हॅक्सीन स्लॉट मिळेल.
याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिक भारतात राहतात. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये त्यांची संख्या जास्त आहे. मोठ्या शहरांमध्ये लोकसंख्या जास्त असल्यामुळे कोरोना पसरण्याची भीती नाकारता येत नाही. अशा संभाव्य परिस्थितीशी सामना करण्यासाठी आणि परदेशी नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.