दुकानदाराचा मोफत मांस देण्यास नकार; माथेफिरुने संतापून दुकानाबाहेर फेकला कुजलेला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 18:14 IST2025-02-11T17:55:52+5:302025-02-11T18:14:49+5:30
तमिळनाडूमध्ये एका माथेफिरुने स्मशानातील मृतदेह रस्त्यावरील एका दुकानासमोर आणून टाकल्याचा प्रकार समोर आला.

दुकानदाराचा मोफत मांस देण्यास नकार; माथेफिरुने संतापून दुकानाबाहेर फेकला कुजलेला मृतदेह
Shocking News: तमिळनाडूमध्ये मोफत मांस न दिल्याने एका व्यक्तीने केलेल्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला. फुकटात मांस न मिळाल्याने एका व्यक्तीने चक्क मृतदेहच आणून दुकानासमोर फेकून दिला. हा सगळा प्रकार ऐकून पोलिसही चक्रावून गेले. या घटनेनंतर ती व्यक्ती तिथून पळून गेली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. धक्कादायक बाब म्हणजे त्या माथेफिरुने तो मृतदेह स्मशानातून आणला होती आणि तो कुजलेला होता. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं तेव्हा तो स्मशानातील कर्मचारी असल्याचे समोर आलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
तामिळनाडूच्या चेट्टीपट्टी भागात हा सगळा प्रकार घडला. कुमार असे आरोपीचे नाव असून तो स्मशानभूमीत काम करतो. पोलिसांना चौकशीत आढळलं की आरोपी कुमार दुकानदाराकडे मोफत मांस मागत होता. मात्र दुकानदार मणियारसनने त्याला फुकट मास देण्यास नकार दिला तेव्हा कुमारला खूप राग आला आणि त्याने बदला घेण्याचे ठरवले. बदला घेण्यासाठी कुमारने जी पद्धत वापरली ती अतिशय धक्कादायक होती. कुमारने कुजलेला मृतदेह दुकानासमोर फेकला.
त्यानंतर आरोपी कुमारने मणियारसनला या भागात काम करू देणार नाही, अशी धमकीही दिली. त्यानंतर आरोपी कुमार तिथून पळून गेला. कुमार हा स्मशानभूमीत काम करतो. पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मृतदेह पाहून दुकानदाराने तत्काळ पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन स्मशानभूमीत परत पाठवला. मृतदेह फेकणाऱ्या व्यक्तीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
मटण खूप महाग झाले असून ते फुकट देऊ शकत नाही, असे मणियारासनने कुमारला सांगितले होते. मणियारासन असं म्हटल राग येऊन कुमार दुकानातून निघून गेला. पण काही काळानंतर तो एवढं भयंकर पाऊल उचलेल याची कुणालाही कल्पना नव्हती.