साखरपुड्यात रबडी खाणं पडलं महागात, 272 जणांना विषबाधा; वधू-वरही आजारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 13:25 IST2022-05-06T13:24:32+5:302022-05-06T13:25:32+5:30
food poisoning : या कार्यक्रमात मुलगी आणि मुलाच्या बाजूने जवळपास 600 लोक सहभागी झाले होते. यावेळी 400 लोकांनी जेवण केले आणि अर्ध्या तासानंतर बहुतेकांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाल्याचे सांगण्यात आले.

साखरपुड्यात रबडी खाणं पडलं महागात, 272 जणांना विषबाधा; वधू-वरही आजारी
मध्य प्रदेशातील बैतुलमध्ये एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात रबडी खाल्ल्यानंतर 272 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. विषबाधा झालेल्या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे सर्व लोक गुरुवारी रात्री उशिरा साखरपुड्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. विषबाधा झालेल्या लोकांमध्ये वधू आणि वर यांचा देखील समावेश आहे. उपचारानंतर बहुतेकांना घरी सोडण्यात आले. मात्र काही लोकांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना बैतुलच्या बोर्डेही पोलीस ठाण्यातील हद्दीतील आहे. याठिकाणी पिंडराई गावात धारा सिंह रघुवंशी नावाच्या व्यक्तीच्या घरी साखरपुड्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात मुलगी आणि मुलाच्या बाजूने जवळपास 600 लोक सहभागी झाले होते. यावेळी 400 लोकांनी जेवण केले आणि अर्ध्या तासानंतर बहुतेकांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाल्याचे सांगण्यात आले. तेथे उपस्थित काही लोकांनी सांगितले की, रबडी खाल्ल्यानंतरच लोकांची तब्येत बिघडली आहे.
दरम्यान, आजारी लोकांना तातडीने सामुदायिक आरोग्य केंद्र मुलताई येथे दाखल करण्यात आले. शासकीय रुग्णालयात जागा कमी असल्याने प्रशासनाने दोन खासगी रुग्णालयांची मदत घेऊन काही रुग्णांना तेथे दाखल केले. जिल्ह्यातील इतर ठिकाणांहूनही डॉक्टरांना उपचारासाठी बोलावण्यात आले होते. रात्री पोलीस आणि अन्न विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अन्नाचे नमुने घेतले. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. रिपोर्ट आल्यानंतर जेवणात काय चूक झाली, ज्यामुळे लोकांना अन्नातून विषबाधा झाली, हे समजून येईल.