पाच वर्षांपूर्वी या मंदिरात पूजा करताना भीती वाटायची; CM योगी असं का म्हणाले..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 16:25 IST2022-07-14T16:20:46+5:302022-07-14T16:25:07+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरच्या मान सरोवर शिव मंदिर आणि रामलीला मैदानाच्या सुशोभीकरण प्रकल्पाचे उद्घाटन केले.

पाच वर्षांपूर्वी या मंदिरात पूजा करताना भीती वाटायची; CM योगी असं का म्हणाले..?
गोरखपूर :उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या गोरखपूर दौऱ्यावर आहेत. गोरखपूर दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मान सरोवर शिव मंदिराचे आणि रामलीला मैदानाच्या सुशोभीकरण प्रकल्पाचेही उद्घाटन केले. यावेळी सीएम योगी यांनी मान सरोवर मंदिराशी संबंधित त्यांच्या जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. 'एक काळ असा होता की येथे पूजा करताना मला भीती वाटायची,' असं योगी म्हणाले.
'पूर्वी भीती वाटायची'
श्रावनाच्या पहिल्या दिवशी गोरखपूरमधील मान सरोवर शिव मंदिरात भगवान भोलेनाथांचा अभिषेक केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, 'मंदिराची अवस्था पाच वर्षांपूर्वीपर्यंत जीर्ण होती. इथे पूजा करताना मंदिर कधी कोसळेल याची भीती वाटायची. जवळच्या तलावात म्हशी आंघोळ करत असत, तिथे खूप घाण असायची. कोणत्याही सोयीसुविधा नव्हत्या, मात्र आज हे पर्यटनस्थळ असल्याने येथे सुशोभीकरणाचे सर्व काम पूर्ण झाले आहे.'
ते पुढे म्हणाले की, 'आज पवित्र श्रावन महिन्याच्या पहिल्या तारखेला मला गोरखपूरच्या मानसरोवर शिवमंदिरात भगवान भोलेनाथांचा अभिषेक करण्याचे सौभाग्य मिळाले आहे. रामलीला मैदानाच्या सुशोभीकरणाचा प्रकल्पही सुरू करण्याची संधी मिळाली. मला कळविण्यास आनंद होत आहे की, लोकभावनेनुसार येथील उत्कृष्ट पर्यटन सुविधांच्या विकासासोबतच आज सुशोभीकरणाचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. मंदिरांच्या उभारणीमुळे प्रवाशांच्या सुविधांचा विकास झाला आहे.'
मंदिराचे सुशोभिकरण
मानसरोवर शिवमंदिर सुशोभित करण्यासाठी 6 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मंदिर परिसरात बहुउद्देशीय सभागृह, स्वच्छतागृहे, 50 लोकांची क्षमता असलेला रात्र निवारा, दोन पर्यटक निवारा, संकुलात असलेल्या तलावावरील लाल दगडी रेलिंग, हवनकुंड, लाल दगडी पाथवे, उद्यान, स्त्री-पुरुष व अपंगांसाठी शौचालय ब्लॉक, पार्किंग, सीमा भिंत बांधकाम, लँडस्केपिंग, प्रवेशद्वार, पार्किंगसह सौर पॅनेल आणि व्हिक्टोरिया आणि गार्डन लाइट्स बसविण्यात आले आहेत.