जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत ५ दहशतवाद्यांना कंठस्नान, २ जवान शहीद
By Admin | Updated: February 13, 2016 15:26 IST2016-02-13T14:22:04+5:302016-02-13T15:26:38+5:30
जम्मू-काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्यात कालपासून सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांदरम्यान सुरू असलेल्या चकमकीत जवानांना ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले, मात्र २ जवान शहीद झाले.

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत ५ दहशतवाद्यांना कंठस्नान, २ जवान शहीद
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १३ - जम्मू-काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्यात कालपासून सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांदरम्यान सुरू असलेल्या चकमकीत जवानांना ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. मात्र या चकमकीत दोन जवानही शहीद झाले असून एका अधिका-यासह चार जवान जखमी झाले आहेत.
उत्तर काश्मीरमधील कूपवाडा जिल्ह्यात चौकीबल भागातील मरसारी गावात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती शुक्रवारी सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली असता त्यांनी राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलिस दल व राज्य पोलिसांच्या विशेष कृती गटाच्या सहाय्याने संयुक्तरित्या शोधमोहिम हाती घेतली. दहशतवादी लपून बसलेल्या घराला पोलिसांनी वेढा देताच दहशतवाद्यांनी अंदाधुद गोळीबार सुरू केला, जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. मात्र या घटनेत दोन जवान शहीद आणि ५ जण जखमी झाले. बराच वेळ सुरू असलेल्या या चकमकीत जवानांनी काल ४ दहशतवाद्यांना अखेर कंठस्नान घातले तर आज दुपारी पाचवा दहशतवादी ठार झाला.
दरम्यान जखमी जवानांवर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.