पहिल्यांदाच विमानात बसला अन् टॉयलेटचं दार समजून 'एन्ट्री गेट' उघडायला गेला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 11:29 IST2018-09-25T11:22:04+5:302018-09-25T11:29:41+5:30
गो एअरच्या ए-320 या विमानात 150 प्रवासी होते. या घटनेनंतर संबंधित प्रवाशाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.

पहिल्यांदाच विमानात बसला अन् टॉयलेटचं दार समजून 'एन्ट्री गेट' उघडायला गेला!
पाटणा - पहिल्यांदाच विमान प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने विमानातील टॉयलेटचा दरवाजा समजून चक्क विमानाचे मुख्य प्रवेशद्वार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हवेचा दाब मोठ्या प्रमाणात असल्याने तो दरवाजा उघडला नाही. 22 सप्टेंबर रोजी दिल्ली ते पटना या विमानप्रवासात प्रवाशांना या थरारक घटनेचा अनुभव आला. विशेष म्हणजे प्रवाशाच्या या कृत्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती.
गो एअरच्या ए-320 या विमानात 150 प्रवासी होते. या घटनेनंतर संबंधित प्रवाशाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, पहिल्यांदाच विमान प्रवास करत असल्याचे सांगितल्यानंतर या प्रवाशाला सोडून देण्यात आले. एका प्रवाशाने विमान हवेत असतानाच विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेजारील एका प्रवाशाने धोक्याचा अलार्म वाजवला. त्यामुळे क्रू मेंबरने तात्काळ संबंधित प्रवाशाला तसे करण्यापासून रोखले. तर विमानाचे लँडिंग झाल्यानंतर संबंधित प्रवाशाची सीआयएसएफकडून चौकशी करण्यात आल्याचे गो-एअरच्या एका प्रवक्त्याने सांगितले. या युवकाचे वय अंदाजे 20 वर्षे असून तो अजमेरला जात होता. दरम्यान, तरुणाचे हे कृत्य पाहून विमानातील काही प्रवाशांनी त्याला मारहाण करण्याचाही प्रयत्न केला होता.