पहिल्या दिवशी 62 टक्के लसीकरण, राज्यात १८ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना दिली कोरोना लस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 01:27 AM2021-01-17T01:27:07+5:302021-01-17T07:19:01+5:30

मुंबईत ६६०, मुंबई उपनगरात १२६६ कर्मचाऱ्यांचे म्हणजेच एकूण १ हजार ९२६ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. त्याखालोखाल पुण्यात १ हजार ७९५ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. राज्यात वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे केवळ १६७ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.

On the first day, 62 per cent vaccination was given to more than 18,000 employees in the state | पहिल्या दिवशी 62 टक्के लसीकरण, राज्यात १८ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना दिली कोरोना लस

पहिल्या दिवशी 62 टक्के लसीकरण, राज्यात १८ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना दिली कोरोना लस

Next

मुंबई : राज्यात शनिवारपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली, राज्यातील २८५ केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. यातील सहा केंद्रांवर कोव्हॅक्सिन तर अन्य केंद्रांवर सिरमची कोविशिल्ड ही लस देण्यात आली.  राज्यात पहिल्याच दिवशी सुमारे १८ हजार ३३८ हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, याचे प्रमाण ६४ टक्के इतके आहे. राज्यात दिवसभरात मुंबईत सर्वाधिक लसीकरण करण्यात आले.

मुंबईत ६६०, मुंबई उपनगरात १२६६ कर्मचाऱ्यांचे म्हणजेच एकूण १ हजार ९२६ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. त्याखालोखाल पुण्यात १ हजार ७९५ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. राज्यात वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे केवळ १६७ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी लसीकरण सुमारास मोहिमेचा आरंभ करण्यात आला. दिवसभरात लसीकरण मोहिमेला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्याने सायंकाळी उशिरापर्यंत लसीकरण सुरू होते. राज्यात कोणत्याही लसीकरण केंद्रावर लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. काही ठिकाणी ऑनलाइनला अडथळे आले.

अदर पूनावाला यांनी घेतली लस - 
जगाला लस पुरवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक अदर पूनावाला यांनीही शनिवारी लस टोचून घेतली. स्वत:च्याच कंपनीत तयार झालेल्या कोविशिल्डच्या लसीकरणाचा व्हिडिओ आणि संदेश त्यांनी ट्विटरवरून ‘शेयर’ केला. 

ॲपमध्ये तांत्रिक अडचण

  • राज्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर ज्या ठिकाणी कोविन ॲपमध्ये तांत्रिक अडचण आली तेथे मॅन्युअल नोंदणीसाठी केंद्र शासनाने परवानगी दिली. बऱ्याच ठिकाणी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लाभार्थ्यांची नोंदणी झाली. 
  •  लसीकरण प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांना नोंदणी क्रमांक देण्यात आला होता हा क्रमांक पडताळून ओळखपत्राची माहिती घेऊन स्वाक्षरीनंतर लसीकरण करण्यात येत होते.
     

सायंकाळी ७ पर्यंतची लसीकरण आकडेवारी -
(कंसात लसीकरण झालेले कर्मचारी)  

- अकोला (२३८), अमरावती (४४०), बुलढाणा (५७५), वाशीम (१६७), यवतमाळ (३०७), भंडारा (२६५), वर्धा (३४४), चंद्रपूर (३३१), गडचिरोली (२१७), गोंदिया (२१३), नागपूर (७७६) 
- औरंगाबाद (६४७), हिंगोली (२००), जालना (२८७), परभणी (३७१), बीड (४५१), लातूर (३७९), नांदेड (२६२), उस्मानाबाद (२१३) 
- कोल्हापूर (५७०), सांगली (४५६), रत्नागिरी (२७०), सिंधुदुर्ग (१६५)  
- मुंबई (६६०), मुंबई उपनगर (१२६६), पालघर (२५७), ठाणे (१७४०), रायगड (२६०) 
- अहमदनगर (७८६), धुळे (३८९), जळगाव (४४३), नंदुरबार (२६५), नाशिक (७४५)
- पुणे (१७९५), सातारा (६१४), सोलापूर (९९२)

थोडासा त्रास...
जामनेर येथील केंद्रावर परिचारिका आशा तायडे यांना लस घेतल्यानंतर घशाला कोरड पडण्यासह खोकला आला. त्यांना औषधोपचार करून अर्धा तासाने घरी पाठविण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी सांगितले.

दीर्घ प्रतीक्षेनंतर लस मिळाल्याचा आनंद
डोळ्यांना न दिसणाऱ्या विषाणूसोबत मागील अनेक महिन्यांपासून आपण लढा देत आहाेत. त्यात डॉक्टर, अधिकारी, सफाई कर्मचारी - परिचारिका असे अनेक घटक अहोरात्र अविरतपणे काम करत आहेत. त्यामुळे आमच्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. दीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज लसीकरणात प्राधान्य मिळाल्याचा आनंद आहे. शिवाय, पालिकेच्या रुग्णालयातही लसीकरणासाठी उत्तम व्यवस्थापन आणि उपाययोजना करण्यात आल्या आहेत, हेही कौतुकास्पद आहे.
- डॉ अंजली पाटील, कर्करोग तज्ज्ञ, सैफी आणि भाटिया रुग्णालय, मुंबई

लस घेण्यापूर्वी वाटत होती भीती...
गेली १२ वर्षे अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आहे. आरोग्यसेवा क्षेत्रातील तसा कनिष्ठ घटक असूनही पहिल्याच दिवशी लस मिळाली याचा आनंद आहे. लस घेण्यापूर्वी भीती वाटत होती, परंतु डोस घेतल्यानंतर अत्यंतिक समाधान वाटत आहे.
- रुपाली शिंदे, अंगणवाडी सेविका

आज देशात लसीकरण नाही -
केंद्र शासनाशी कोविन ॲप संदर्भात चर्चा झाल्यानंतर लसीकरणाचे पुढील सत्र सोमवारी किंवा मंगळवारी घेतले जाईल, असे आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. रविवारी कोणत्याही लसीकरण केंद्रावर लस देण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: On the first day, 62 per cent vaccination was given to more than 18,000 employees in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.