डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 06:29 IST2025-07-20T06:29:17+5:302025-07-20T06:29:31+5:30
‘डिजिटल अटक’च्या गुन्ह्यांमध्ये देशातील पहिल्यांदाच शिक्षा झाल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये या शिक्षा झाल्या.

डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
डॉ. खुशालचंद बाहेती
कोलकाता/ लखनौ : ‘डिजिटलअटक’च्या गुन्ह्यांमध्ये देशातील पहिल्यांदाच शिक्षा झाल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये या शिक्षा झाल्या.
पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप
पार्था कुमार मुखर्जी या निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला ऑक्टोबर २०२४ मध्ये नऊ आरोपींनी व्हॉट्सॲपने संपर्क साधला. मुंबई पोलिस, सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांनी मुखर्जी यांच्यावर आर्थिक गुन्ह्यांचे, मनी लाँड्रिंगचे आरोप केले आणि “डिजिटलअटक”करुन १ कोटी रुपये ट्रान्सफर करून घेतले.
प. बंगाल पोलिसांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये मोहम्मद इम्तियाज अन्सारीसह ९ जणांना अटक केली. या टोळीने देशात १०८ नागरिकांची १०० कोटींची फसवणूक केली. रणाघाट सायबर ठाण्याने यात २६०० पानी आरोपपत्र सादर केले. या गुन्ह्यात कळ्याणी (प. बंगाल) न्यायालयाने ९ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २४ फेब्रुवारीला सुरू झालेल्या खटल्याचा निकाल साडेचार महिन्यांत लागला.
डॅाक्टरांचे ८५ लाख लुटले
एप्रिल २०२४ मध्ये किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, लखनौ येथील वरिष्ठ फिजिशियन डॉ. सौम्या गुप्ता यांना अज्ञाताचा फोन आला. त्याने दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावरील सीमाशुल्क अधिकारी असल्याचे सांगत डॉ. गुप्तांच्या नावे असलेले एक पार्सल जप्त केल्याचे सांगितले. यात काही पासपोर्ट, एटीएम कार्डस् आणि १४० ग्रॅम एमडीएमए-असल्याचा आरोप होता.
कॉल बनावट सीबीआय अधिकाऱ्याकडे ट्रान्सफर केला. त्याने डॉ. गुप्तांना सात वर्षांची शिक्षा होईल, अशा धमक्या देत बँक तपशील, कागदपत्रे मिळविली. १० दिवस “डिजिटल अटक” करून चार खात्यांमध्ये ८५ लाख जमा केले. लखनौ सायबर पोलिसांनी मशौना (आजमगढ) येथील देवाशिष रायला अटक केली. १४ महिन्यांत खटल्याचा निकाल लागून रायला सात वर्षांची सक्तमजुरी, दंडाची शिक्षा झाली. देशात डिजिटल अरेस्टमधील ही पहिलीच शिक्षा आहे.