आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 17:44 IST2025-11-08T17:42:07+5:302025-11-08T17:44:12+5:30
भारतात लोक काय करतील, अगदी शिकलेलेही याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. मेट्रो स्टेशनबद्दलची बातमी वाचून तुम्हाला खरंय असेच वाटेल. मेट्रो स्टेशन उभारणाऱ्या कंपनीनेच झालेली चूक निस्तरण्यासाठी हा जुगाड शोधला.

आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
९० अंशामध्ये पूल बांधल्याचे प्रकरण चांगलेच गाजले. उत्तर प्रदेशातील इंजिनिअरिंगचा हा नमुना मस्करीचा विषय ठरला. तसाच काहीसा प्रताप आता मेट्रो स्टेशन उभारताना झाला आहे. फोटोमध्ये तुम्ही जे स्टेशन बघत आहात, ते ४५ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले आहे. दोन वर्ष हे मेट्रो स्टेशन उभारण्यासाठी लागले. त्यासाठी रस्ता बंद ठेवण्यात आला. पण, वाहतुकीसाठी जेव्हा रस्ता खुला करण्यात आला, तेव्हा मेट्रो स्टेशनची उंचीच कमी असल्याचे समोर आले. त्यानंतर इंजिनिअर्संनी एक जुगाड शोधला.
भोपाळमध्ये मेट्रोचे काम सुरू आहे. प्रगती पेट्रोल पंपजवळ मेट्रो स्टेशन उभारण्यात आले. पण, त्याची उंची फक्त ४.५ मीटर इतकीच आहे. केंद्रीय विद्यालय मेट्रो स्टेशन असे या स्टेशनचं नाव असून, वाहने येता जाता या स्टेशनला घासू लागली. त्यामुळे खांबाचेही नुकसान होऊ लागले. एका खांबाचा बराच भाग निखळला. त्यानंतर या स्टेशनची उंची मोजण्यात आली आणि हे समोर आले.
मेट्रो स्टेशनची उंची वाढवण्यासाठी काय केलं?
दोन वर्ष काम करून उभारण्यात आलेल्या या स्टेशनची उंची वाढवायची कशी असा प्रश्न निर्माण झाला. कारण स्टेशन त्याचे खांब वाढवणे शक्य नव्हते. खरंतर नियमानुसार, रस्त्यापासून मेट्रो स्टेशनची उंची ५.५ मीटर म्हणजे १८ फूट असायला हवी.
मेट्रो स्टेशन बनवताना याकडेच दुर्लक्ष करण्यात आले. मग मेट्रो स्टेशनचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने काय केलं, तर रस्ताच खोदला. मेट्रो स्टेशन आणि रस्त्यामधील उंची वाढवण्यासाठी हे करण्यात आले.
तयार केलेला रस्ताच खोदला
मेट्रो स्टेशनच्या कामामुळे रस्ता बंद होता. तो खराब झाला होता. पण, तो पुन्हा खुला करण्याआधी नव्याने तयार करण्यात आला होता. पण, त्यानंतर कंत्राटदाराने हा रस्ताही खोदल्याने पैशाची नासाडी झाली.