मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 20:54 IST2025-09-19T20:52:46+5:302025-09-19T20:54:13+5:30

Assam Rifles Truck Attacked In Manipur: इम्फाळहून बिष्णुपूरला जात असताना आसाम रायफल्सच्या ताफ्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला.

firing on assam rifles convoy in bishnupur manipur two jawans martyred and many injured | मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

Assam Rifles Truck Attacked In Manipur: काही दिवसांपूर्वीच मणिपूरच्या दोन्ही गटांमध्ये सामंजस्य करण्यात, तणाव मिटविण्यात यश आले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मणिपूर दौरा ठरविण्यात आला होता. अलीकडेच पंतप्रधान मोदी मणिपूरला जाऊन आले. त्यांची पाठ फिरत नाही तोच पुन्हा एकदा हिंसाचार उसळल्याचे पाहायला मिळाले. ही घटना ताजी असतानाच मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात आसाम रायफल्स तुकडीतील दोन जवानांना हौतात्म्य आले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला. यात दोन जवानांना हौतात्म्य आले आणि अनेक जण जखमी झाले. सायंकाळी ५.५० च्या सुमारास, नंबोल सबल भागाजवळ आसाम रायफल्सच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टाटा ४०७ वाहनावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. हा ताफा इम्फाळहून बिष्णुपूरला जात होता.

आसाम रायफल्स आणि स्थानिक पोलिकांची संयुक्त शोधमोहीम

जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेवर बोलताना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक तपासणी केली असून, गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला अचानक झाला. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी ताफ्यावर जोरदार गोळीबार केला. हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर, आसाम रायफल्स आणि स्थानिक पोलिसांनी परिसरात संयुक्त शोध मोहीम सुरू केली आहे.

दरम्यान, हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असावा, असा कयास सुरक्षा यंत्रणांचा आहे. तसेच ताफ्याच्या मार्गावर काही सुरक्षा त्रुटी होत्या का, याचाही तपास केला जात आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिसरात सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. जखमींना त्वरित आणि प्रभावी वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी आरोग्य विभागालाही सतर्क करण्यात आले आहे. मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी एक्सवर पोस्ट करून या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

 

Web Title: firing on assam rifles convoy in bishnupur manipur two jawans martyred and many injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.