धावत्या एक्स्प्रेसमध्ये गोळीबार : माजी आरपीएफ जवानाच्या वैद्यकीय चाचणीचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:19 IST2025-12-16T13:18:54+5:302025-12-16T13:19:38+5:30
आरोपी चौधरीने मानसिक आजाराचे कारण देत सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.

धावत्या एक्स्प्रेसमध्ये गोळीबार : माजी आरपीएफ जवानाच्या वैद्यकीय चाचणीचे निर्देश
मुंबई : धावत्या एक्स्प्रेसमध्ये आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यासह तीन प्रवाशांवर गोळीबार करून त्यांचे जीव घेणारा आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनर्सिंग चौधरी याची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश सत्र न्यायालयाने कारागृह प्रशासनला सोमवारी दिले.
आरोपी चौधरीने मानसिक आजाराचे कारण देत सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एच. पठाण यांनी चौधरीची वैद्यकीय चाचणी करून १९ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. चौधरी सध्या ठाणे कारागृहात आहे. त्याने ३१ जुलै २०२३ रोजी पालघर रेल्वे स्थानकाजवळ जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये गोळीबार करून वरिष्ठ सहकारी सहायक उपनिरीक्षक टीकाराम मीणा आणि तीन प्रवाशांची हत्या केल्याचा आरोप आहे. पळण्याचा प्रयत्न करताना त्याला अटक केली होती.
आरोपीने अॅड. अमित मिश्रा यांच्यामार्फत दाखल केलेल्या जामीन अर्जात आपण 'व्हाइट मॅटर डिसीज'ने ग्रस्त असल्याचा दावा केला. हा आजार मेंदूतील 'व्हाइट मॅटर'च्या न्हासाशी संबंधित असल्याचे अर्जात म्हटले आहे.
आरोपी मानसिक रुग्ण
आरोपी अंशतः मानसिक रुग्ण असून, कधीकधी विचित्र वागतो. भ्रमांच्या भोवऱ्यात अडकतो. आरोपी भ्रमात्मक विकाराने ग्रस्त आहे. आपल्याकडून काय गुन्हा घडला आहे, याची त्याला कोणतीही जाणीव नाही, असा दावा चौधरीच्या जामीन अर्जात केला आहे.
सरकारी पक्षाने जामिनाला विरोध केला. आरोपीवरील आरोप गंभीर असून, गुन्हा सिद्ध झाला, तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते, असे वकिलांनी म्हटले.