इम्फाळ : मणिपूरमधील इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कडंगबंद भागामध्ये बुधवारी पहाटे एका गावावर दहशतवाद्यांनी गोळीबार, बॉम्बहल्ला केला. त्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या राज्यात मंगळवारी महिलांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करणाऱ्यांशी सुरक्षा दलाची चकमक झाली होती. त्यानंतर आता गावावर हल्ले झाल्यामुळे मणिपूरमधील तणावात भर पडली आहे.
पोलिसांनी सांगितले की, कांगपोकपी जिल्ह्यातील डोंगराळ भागातून दहशतवाद्यांनी कमी उंचीवर असलेल्या कडंगबंद भागातील गावावर गोळीबार केला. तसेच बॉम्बहल्लेही केले. ही माहिती मिळताच सुरक्षा जवान त्या परिसरात तत्काळ पोहोचले व परिस्थिती नियंत्रणात आणली. मणिपूरमध्ये अनेकवेळा दहशतवाद्यांनी हल्ले केले. त्यामुळे नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी घरेदारे सोडून सुरक्षित ठिकाणी पलायन केले.
प्रकल्पांबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा- मणिपूरमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री गोविंददास कोन्थौजम यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांच्याशी राज्यातील दोन प्रकल्पांबाबत चर्चा केली.- इम्फाळ रिंग रोड प्रकल्प, मणिपूर इन्फोटेक असे ते प्रकल्प असून त्यांना आशियाई विकास बँक, जागतिक बँकेने आर्थिक पाठबळ दिले आहे.
हिंसाचार हे काँग्रेसचे पाप : एन. बीरेन सिंह- मणिपूरमध्ये होत असलेला वांशिक हिंसाचार हे काँग्रेसचे पाप आहे असे प्रत्युत्तर त्या राज्याचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी दिले आहे. - मणिपूरचे मुख्यमंत्री जनतेची माफी मागू शकतात तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या राज्याचा दौरा करणे का टाळतात असा सवाल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला होता.
रोज जप्त होताहेत मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे बिष्णुपूर आणि थौबल जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांनी शोधमोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला.
बिष्णुपूर जिल्ह्यातील थोंगखोंग्लोक गावातून, सुरक्षा जवानांनी मॅगझिनसह एक एसएलआर, एक ३०३ रायफल, एक १२ बोअर सिंगल बॅरल बंदूक, मॅगझिनसह दोन ९ मिमी पिस्तूल, दोन इन्सास रायफली, चार हातबॉम्ब, एक डिटोनेटर व अन्य प्रकारचा दारूगोळा जप्त करण्यात आला.
लेशंगथेम इकोप पॅट या भागातून काही रायफली, देशी बनावटीची तीन पिस्तुले, एक हातबॉम्ब व दारूगोळा जप्त करण्यात आला. मंगळवारी पोलिसांनी इम्फाळ (पूर्व) जिल्ह्यातील बंगाली क्रॉसिंगजवळील मंत्रीपुखरी बाजारातून कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टी या प्रतिबंधित संघटनेच्या सदस्याला अटक केली.