यशवंत वर्मा प्रकरणात आता नवं वळण; न्यायाधीशांच्या घरी सापडला होता का नोटांचा ढीग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 20:14 IST2025-03-21T20:14:03+5:302025-03-21T20:14:32+5:30
न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोकड सापडली असं वृत्त माध्यमात झळकले होते.

यशवंत वर्मा प्रकरणात आता नवं वळण; न्यायाधीशांच्या घरी सापडला होता का नोटांचा ढीग?
नवी दिल्ली - दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी रोकड सापडल्याची बातमी सकाळपासून माध्यमांत झळकली. या घटनेनंतर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. सुप्रीम कोर्टानेही याची दखल घेतली. त्यानंतर आता या प्रकरणात नवीन वळण आलं आहे. अग्निशमन दलानं न्यायाधीशांच्या घरी रोकड सापडल्याचं वृत्त फेटाळलं आहे. आग विझवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन जवानांना कुठेही रोकड सापडली नाही असं अग्निशमन दलाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी म्हटलं आहे.
अतुल गर्ग म्हणाले की, १४ मार्चच्या रात्री ११.३५ मिनिटांनी दिल्ली इथल्या न्या. वर्मा यांच्या घरी आग लागल्याची सूचना मिळाली. त्यानंतर तातडीने २ अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवले. ११.४३ मिनिटांनी बंब तिथे पोहचले. आग एका स्टोअर रूमला लागली होती. ज्याठिकाणी स्टेशनरी, घरगुती सामान ठेवले होते. आगीवर १५ मिनिटांत नियंत्रण मिळवण्यात आले. तिथे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग विझवल्यानंतर आम्ही तातडीने पोलिसांना माहिती कळवली. त्यानंतर आमची टीम तिथून निघून आली. आग विझवताना आम्हाला कुठेही रोकड सापडली नाही असं त्यांनी सांगितले.
माध्यमांमध्ये दावा
न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोकड सापडली असं वृत्त माध्यमात झळकले. या घटनेला न्या. वर्मा यांच्या दिल्ली हायकोर्टातून इलाहाबाद हायकोर्टात बदली प्रकरणालाही जोडले. सुप्रीम कोर्टाने दोन्ही घटना वेगळ्या असल्याचं सांगत निवेदन जारी केले. मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रीम कोर्टाने रोकड मिळण्याच्या आरोपावर प्राथमिक तपास सुरू केला. ज्यातून रिपोर्ट मागवण्यात आला.
५६ वर्षीय न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी १९९२ साली अधिवक्ता म्हणून रजिस्ट्रेशन केले होते. १३ ऑक्टोबर २०१४ साली ते इलाहाबाद कोर्टात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले. १ फेब्रुवारी २०१६ साली स्थायी न्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली. ६ जानेवारी १९६९ साली यशवंत वर्मा यांचा जन्म इलाहाबाद येथे झाला. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी बी कॉम केले, त्यानंतर मध्य प्रदेशातील रिवा विद्यापीठातून एलएलबीचं शिक्षण पूर्ण केले होते.