प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यातील सेक्टर १८ आणि १९ मध्ये भीषण आग लागली आहे. यामध्ये अनेक टेंट जळून खाक झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम सुरू झालं आहे. सध्या या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. तसेच आगीमागील नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
याआधीही ९ फेब्रुवारी (रविवार) रात्री महाकुंभमेळा परिसरातील अरैलच्या दिशेने असलेल्या सेक्टर २३ मध्ये आग लागली होती. घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. गॅस सिलिंडरमुळे आग लागल्याचं सांगितलं जात होतं. महाराजा भोग नावाच्या एका फूड स्टॉलला आग लागली आणि नंतर ती वाढत गेली.
९ फेब्रुवारीच्या दोन दिवस आधीही महाकुंभमेळा परिसरात आगीची घटना घडली होती. त्यानंतर सेक्टर-१८ मधील शंकराचार्य मार्गावरील एका कॅम्पमध्ये आग लागली. या घटनेत अनेक टेंट जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी आग आटोक्यात आणली.
३० जानेवारी रोजी महाकुंभाच्या सेक्टर २२ मधील अनेक टेंटला आग लागली. या आगीत १५ टेंट जळून खाक झाले. १९ जानेवारी रोजी महाकुंभमेळ्याच्या सेक्टर १९ मध्ये आगीची आणखी एक घटना घडली, जेव्हा एका ठिकाणी ठेवलेल्या गवताला आग लागली. दोन्ही वेळा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आग आटोक्यात आणली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.