जम्मू काश्मीरमधून धक्कादायक बातमी येत आहे. कठुआ जिल्ह्याच्या शिवानगर भागातील एका घराला रात्री आग लागली. या आगीत १० पैकी ६ जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. निवृत्त डीएसपीचे हे घर असून यात या माजी अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला आहे.
एका निवृत्त सहाय्यक मेट्रनच्या भाड्याच्या घरात ही आग लागल्याचे कठुआ जीएमसीचे प्रिन्सिपल एसके अत्री यांनी सांगितले. तसेच या आगीत कुटुंबातील १० पैकी सहा जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. श्वास कोंडल्याने या सहा जणांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदृष्ट्या वाटत आहे. पोलीस पोहोचले असून तपास करत आहेत. पोस्टमार्टेम नंतर कारण समोर येईल.
दरम्यान, जम्मू काश्मीरपासून देशभरातील अनेक राज्यांत थंडीने कहर सुरु केला आहे. यामुळे लोक खोलीमध्ये हिटर लावून किंवा आग पेटवून झोपत आहेत. यामुळे आगीच्या घटनांत किंवा धुरामुळे कोंडल्याने मृत्यूच्या घटनांत वाढ होत आहे.
हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये थंडीचा इशारा दिला आहे. पर्वतीय राज्यांमध्ये जम्मू-काश्मीर हे सर्वात थंड होते. दरम्यान, मंगळवारी श्रीनगरमध्ये उणे ५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. श्रीनगरमधील हे या मोसमातील सर्वात कमी तापमान होते. दल सरोवरासह काश्मीरमधील जवळपास सर्व जलस्रोतांमध्ये पाणी गोठण्यास सुरुवात झाली आहे.