बालासोर तिहेरी रेल्वे अपघातप्रकरणी पोलिसांकडून एफआयआर; तपास दिला सीबीआयकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 06:04 IST2023-06-06T06:03:03+5:302023-06-06T06:04:06+5:30
या प्रकरणात कोण कर्मचारी दोषी आहेत, हे अद्याप निश्चित केलेले नाही.

बालासोर तिहेरी रेल्वे अपघातप्रकरणी पोलिसांकडून एफआयआर; तपास दिला सीबीआयकडे
भुवनेश्वर : निष्काळजीपणाने जीवाला धोका निर्माण करणे व मृत्यूला कारणीभूत ठरणे असे आरोप ठेवून ओडिशातील भीषण रेल्वे अपघात प्रकरणी रेल्वे पोलिसांनी एफआयआर दाखल केला. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला जाणार आहे.
बालासोरमध्ये तीन रेल्वेगाड्यांच्या अपघातात २७५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात कोण कर्मचारी दोषी आहेत, हे अद्याप निश्चित केलेले नाही. सदर अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी रेल्वे खात्याने केली होती. गाड्या कोणत्या ठिकाणी आहेत, याची माहिती देणाऱ्या इंटरलॉकिंग यंत्रणेत छेडछाड केली असावी, असा संशय रेल्वेने व्यक्त केला आहे. (वृत्तसंस्था)
...म्हणून तपास दिला सीबीआयकडे
रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेशी कोणीतरी छेडछाड केली असावी. त्यामुळेच ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात घडला, असा प्राथमिक तपासाचा निष्कर्ष आहे. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली, असे केंद्र सरकारच्या सूत्रांनी सांगितले.
सीबीआयचे पथक अपघातस्थळी मंगळवारी जाण्याची शक्यता आहे.