विमानात पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण, दिल्ली विमानतळावर करावे लागले इमर्जन्सी लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 13:46 IST2023-11-29T13:31:02+5:302023-11-29T13:46:50+5:30
दोघांमधील भांडण इतके वाढले की हाणामारीपर्यंत पोहोचले. त्यामुळे विमान लँडिंग करावे लागले.

विमानात पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण, दिल्ली विमानतळावर करावे लागले इमर्जन्सी लँडिंग
नवी दिल्ली : अनेकदा तुम्ही पती-पत्नीचे भांडण घरांमध्ये किंवा भर रस्त्यात झालेले पाहिले असेल. मात्र, चक्क विमानात पती-पत्नी भांडताना पाहिले नसेल. दरम्यान, म्युनिकहून येणाऱ्या लुफ्थांसाच्या विमानात पती-पत्नीमध्ये भांडण झाले. दोघांमधील भांडण इतके वाढले की हाणामारीपर्यंत पोहोचले. त्यामुळे विमान लँडिंग करावे लागले.
पती-पत्नीच्या भांडणामुळे विमानातील परिस्थिती बिघडल्यानंतर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) आपत्कालीन लँडिंग करावे लागले. दरम्यान, लुफ्थांसाचे फ्लाइट क्रमांक LH772 म्युनिकहून थायलंडची राजधानी बँकॉकला जात होते.
वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पती-पत्नीच्या भांडणानंतर विमान दिल्लीच्या दिशेने वळवण्यात आले. तर दिल्ली विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) ही माहिती मिळताच सुरक्षा कर्मचारी विमानतळावर पोहोचले आणि विमानाचे दरवाजे उघडण्याची वाट पाहू लागले.
A Lufthansa flight (LH772) from Munich to Bangkok has been diverted to Delhi due to an unruly passenger on board. Security personnel have reached and waiting for flight gates to be opened: Delhi airport sources
— ANI (@ANI) November 29, 2023
भांडणाचे कारण कळू शकले नाही
दरम्यान, हे पती-पत्नी कोठे राहणारे आहेत आणि त्यांच्यात भांडण कशामुळे झाले, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या घटनेनंतर दोघांनाही विमानातून उतरवण्यात आले की नाही हे देखील अद्याप समजू शकले नाही.